सोयगाव तालुक्यातील ऐतिहासिक रुद्रेश्वर लेणी व स्मारक परिसरातील १८ पितळी घंट्या चोरी, भक्तांमधून संताप ----




दिलीप शिंदे 
 सोयगाव दि. ०५ तालुक्यातील ऐतिहासिक रुद्रेश्वर मंदिर व स्मारक लेणी परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत मंदिरातील तब्बल १८ पितळी घंटे चोरून नेल्याची घटना दि.०४ रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घंटांचे एकूण अंदाजे वजन २५ ते ३० किलो असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. 
ऐतिहासिक स्मारक परिसरात झालेल्या या चोरीमुळे खळबळ उडाली असून, पुरातत्व विभागाने सोयगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.पुरातत्व विभाग, वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास दि.०४ रविवारी सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले.दि.०३ शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील पितळी घंटा ज्या साखळ्यांनी बांधलेल्या होत्या, त्या साखळ्या तोडून १८ घंटे लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.मंदिरात नियमित पाहणी करण्यासाठी कर्मचारी गेले असता घंटा जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पाहणी केली असता घंटांना बांधलेल्या साखळ्या तोडल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.पुरातत्व विभागाच्या वतीने के. आर. सोनवणे व एस. पी. बोराडे यांनी सोयगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरीस गेलेल्या १८ पितळी घंटांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

रुद्रेश्वर लेणी व मंदिर हे ऐतिहासिक महत्त्व असलेले स्मारक असल्याने या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे.मंदिरातील घंट्या चोरी गेल्याने भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments