कमालपूर-आडबंगनाथ-माळवाडगाव रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदन




टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील श्री महातीर्थ क्षेत्र चक्रधर मंदिर ते श्री क्षेत्र आडबंगनाथ देवस्थान, माळवाडगाव या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे सचिन मुरकुटे, प्रणव कारजंकर, मच्छिंद्र पा. पटारे यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली.
    कमालपूर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतही या रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत ठराव करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावात कमालपूर येथील श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे धार्मिक महत्त्व तसेच माळवाडगाव येथील श्री क्षेत्र आडबंगनाथ देवस्थानचे महत्त्व नमूद करण्यात आले आहे,
श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर ते माळवाडगाव हा सुमारे ६ किलोमीटरचा रस्ता दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडतो. या मार्गावर भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने भाविक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
   खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेऊन रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सचिन मुरकुटे यांनी दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या रस्त्याची सद्यस्थिती तसेच भाविकांना होणाऱ्या अडचणी खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्या.
दरम्यान, दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या रस्त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याबाबत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
      यावेळी सचिन भाऊ मुरकुटे, प्रणव कारजंकर, मच्छिंद्र पा. पटारे मामा आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments