लोहगाव (वार्ताहर): जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहमदनगर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग आहिल्यानगर यांच्या वतीने दि. २१ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोकमठाण येथे आयोजित वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) नुकतेच संपन्न झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत सेवेची १२ व २४ वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेपासून वेतनवाढीपर्यंत विविध लाभांशी संबंधित प्रशिक्षण असल्याने शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेरचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा समन्वयक अरुण भांगरे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात (TOT) जिल्ह्यातील २३६ प्रशिक्षक शिक्षक सहभागी झाले होते.
कोकमठाण येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये संपन्न झालेल्या या प्रशिक्षणाच्या सत्रांमध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, भारतीय ज्ञानप्रणाली, शाळा मूल्यांकन आराखडा, २१ व्या शतकासाठीची कौशल्ये, मूल्यांची रुजवणूक, व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन, नवीन आव्हाने पेलताना, शिक्षक स्वविकसन व सक्षमीकरण, बालकांचा मोफत सक्तीचा कायदा, मूल्यमापन पद्धती, कार्यालयीन लेखन व पत्रव्यवहार, रजा नियमावली, मूल समजून घेताना, शालेय संस्कृती, शालेय प्रक्रिया, माहिती अधिकार कायदा, सेवा हमी कायदा, ताणतणावाचे व्यवस्थापन, नेतृत्व विकास आणि प्रशासन, शैक्षणिक संशोधन, संवाद कौशल्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता, शालेय समित्या, ऑनलाइन स्रोत व सायबर गुन्हे, शालेय अभिलेखे व शासकीय योजना, शालेय नियोजन इत्यादी विषयांवर राज्य स्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ञ मार्गदर्शक (सुलभक ) यांचे कडून मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांनी प्रशिक्षणास भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, प्रशिक्षक हा शिक्षण विभागाचा दुवा असून कौशल्ये आणि मौलिक शिक्षण विचार आत्मविश्वासाने आणि निष्ठेने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या प्रशिक्षणात प्रत्येक सत्रात शिक्षणविषयक विचारांचा जागर झाला असून हे प्रशिक्षण केंद्र विचारांचे, आदानप्रदानांचे व शैक्षणिक क्रांतीचे केंद्र बनावे.
प्रशिक्षण समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिव्याख्याता व जिल्हा समन्वयक अरुण भांगरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुनील कटारिया यांनी केले. यावेळी मोहटे येथील माधव लाड, संगमनेर येथील सुरेखा भवर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी यांच्यावतीने सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक (सुलभक) यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी अनमोल होन, डॉ. शरद दुधाट, डॉ. अरविंद सगभोर, प्रकाश पारखे, चंद्रशेखर हासे, जालिंदर गागरे, विजय देशमुख, ज्योत्स्ना खोजे, उज्वला वासाळ, अविनाश निकाळजे, सुभाष जाधव, अशोक गायकवाड या तज्ज्ञ मार्गदर्शक (सुलभक) यांनी विशेष परिश्रम घेतले.
अध्यक्षीय भाषणातून अरुण भांगरे यांनी सांगितले की, या प्रशिक्षणातून शिक्षकांमध्ये नवी ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागणार असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया आणि शिक्षकांचे निरंतर समृद्धीकरण होणार आहे.सर्व प्रशिक्षणार्थी यांनी तालुकास्तरावर उत्कृष्ट काम केल्यास,शिक्षकांच्या सबलीकरणातून जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण समन्वयक व सर्व सुलभक टीम यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. आत्मा मलिक शैक्षणिक संकुलाने उत्तम व्यवस्था केल्याने प्रशिक्षणाचा दर्जा सर्व बाजूनी उत्तम ठेवल्याबद्दल प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले.
0 Comments