मातीशी एकरूप झालेल्या माणसांच्या समर्पित भावनेमुळेच प्रवरेचा विश्वास व वेगळेपण सिद्ध होत... नामदार राधाकृष्ण विखे पाटील

लोणी, दि. १० (प्रतिनिधी):

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता स्थापन झालेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नावलौकिक गुणवत्तेमुळे टिकून आहे. दीड लाखांहून अधिक माजी विद्यार्थी यशस्वीपणे विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, ही संस्थेची उपलब्धी असून, मातीशी एकरूप झालेल्या माणसांच्या समर्पित भावनेमुळेच ‘प्रवरेचा’ विश्वास आणि वेगळेपण सिद्ध होत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या स्नेहसंवाद कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संचालक शांतीनाथ आहेर, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी यांच्यासह विद्यार्थी, पालक, विभागप्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. प्रवेश परीक्षेमध्ये गुणवत्तेने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेताना शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांचे प्रतिबिंब हे महाविद्यालयाच्या प्रगतीमधून पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी सिद्ध करून दाखविलेली गुणवत्ता हा संस्थेचा अभिमान असून, यातूनच विद्यार्थी आणि पालकांच्या विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने गुणवत्तेमध्ये कधीही तडजोड केली नाही, उलट अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध प्रयोगांमधून राज्याला दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशोगाथा त्यांना निर्माण करून दिलेल्या संधींमुळेच आज पाहायला मिळतात.

या संस्थेमधून दीड लाखांहून अधिक विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. देशातील आणि परदेशातील विविध शहरांमध्ये या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असून, नामवंत कंपन्यांमधून त्यांनी एकप्रकारे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नावलौकिकही वाढवला आहे. देशाच्या संरक्षण उत्पादनामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गणेश निबे या माजी विद्यार्थ्याचा विशेष उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, केवळ संरक्षण उत्पादनच नाही, तर आता 'निबे स्पेस'च्या माध्यमातून खासगी अंतराळ क्षेत्रातही त्यांनी सुरू केलेले मार्गक्रमण हे सर्वांना प्रेरणा देणारे आहे.

संस्थेमध्ये पन्नास हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या भागात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असून, चार किलोमीटर अंतरावर हायस्कूल आणि सहा किलोमीटर अंतरावर कनिष्ठ महाविद्यालय असल्यामुळे चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकले. येथे येणारा विद्यार्थी हा प्रवरा परिवाराचा घटक होतो. मातीशी बांधिलकी असलेल्या आणि एकरूप झालेल्या माणसांमुळेच प्रवरेचे वेगळेपण सिद्ध होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांचीही भाषणे झाली. संस्थेतील माजी विद्यार्थिनी सलोनी पुलाटे, सायली बहिरट आणि पालक प्रतिनिधी म्हणून आशिष जाधव, श्रीमती भाग्यश्री देशमुख, तसेच प्रवेश समन्वयक अनिल लोंढे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

*कोट:*

"मीसुद्धा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असून माझे शिक्षण याच संस्थेत झाले आहे, असे मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील पहिली इंग्रजी माध्यमातील शाळा १९६४ साली पद्मश्रींनी स्थापन केली, त्याच शाळेत माझे शिक्षण झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील हिनेसुद्धा पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण याच संस्थेत घेतले आहे. त्यामुळे येथील माणसांनी ही संस्था कमालीच्या आत्मीयतेने जोपासली आणि वाढविली आहे."

Post a Comment

0 Comments