परिस जसं लोखंडाचं सोनं करतो, तसंच संत महात्मे हे आपल्या ज्ञानाने, उपदेशाने मनुष्याच्या आयुष्याचं सोनं करू शकतात. पण त्यासाठी संत महात्म्यांची, सद्गुरूंची कृपा हवी. आणि ही सद्गुरू कृपा होण्यासाठी आपण नामस्मरणाची, सत्संगाची संगती केली पाहिजे, आपण या जगात काय धारण केलं पाहिजे तर संत सत्संग केला तरच सद्गुरू कृपा होऊन आपले जीवन, आपलं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. असं सरला बेट चे हभप गणेश महाराज तुपे यांनी सांगितलं,
सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सत चरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन मालिकेत पाचवे पुष्प गुंफताना संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या चार चरणाचा कीर्तनाला घेतलेल्या अभंगांचे कीर्तन सेवेत चिंतन करताना ते बोलत होते. हभप गणेश महाराज तुपे यांनी यावेळी अनेक दृष्टांत देत सद्गुरूंनी, संत महात्म्यांनी कृपा केली तर आयुष्याचे कल्याण होते. ही सद्गुरू कृपा, संत महात्म्यांची कृपा होण्यासाठी मात्र अंतकरणात पवित्रता असली पाहिजे. शुद्ध मनाने नामस्मरण केले तरच संतकृपा होते. शरीरात पित्त, संसारात वित्त, तसं मनात चित्त असायला हवं. शरीरात पित्त नसलं तर प्रकृती खराब होते. संसारात वित्त म्हणजे पैसा नसला तर संसार बिघडतो, बरोबरही कोणी राहत नाही. तसंच मनामध्ये एक चित्त असायला हवं, ते नसलं तर संत कृपा होत नाही. संत महात्म्यांचे एकचित्ताने नामस्मरण केले तरच संत कृपा होते . व संतकृपा झाली की सद्गुरूंची कृपा होते. ईश्वर कृपा होते. मानवी जीवनात भगवंताची कृपा व संत महात्म्यांची कृपा अशा दोन कृपा असतात. या कृपा झाल्या की जिवाचा उद्धार होऊ शकतो. पण त्यासाठी चिंतन महत्वाचे आहे. चिंतनात मोठे समाधान मिळते. हा मानवी देह जन्माला आला की भोग, दुःख येतेच, पण यातून सुटका करायची असेल तर भगवंताचे चिंतन, भजन, नामस्मरण केले पाहिजे, मानवी जीवनात पूर्णत्व, वर्चस्व, ऐश्वर्य हे भोगाने दिसून येत नाही तर ते भगवंताच्या विचाराने शोभून दिसते. त्यासाठी या मनुष्य जीवनात जन्माला आल्यानंतर आपण काय केले पाहिजे. हे महत्त्वाचे आहे. त्यावरच हे जीवन महत्त्वाचं आहे. हे सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे जर्सी व गावरान गाय आहे. जर्सी गाई ही व्यवहारासाठी पण आरोग्यासाठी गावरान गाय महत्वाची आहे. गाईची कुसही पवित्र आहे. पण या पवित्र कुशीमधून काय घ्यायचे हे महत्त्वाचे आहे. गाईच्या कुशी जवळ गोचीड असतो. मात्र तो दूध पिण्याऐवजी तो रक्त पीत असतो. मात्र गाईचे वासरू हे लांब बांधलेले असते मात्र ते सोडले की एका ढुसणीमध्ये गाय पान्हा सोडते व वासरू दूध पिते. त्याप्रमाणे आपण काय घ्यायचे. हे ठरवले पाहिजे. भक्ती भावाने संताजवळ गेले की संतही गाई वासराप्रमाणे प्रेमाचा पान्हा सोडून जीवन सार्थकी लावतात. जसं स्वाती नक्षत्रातील पडणाऱ्या पावसामुळे पिकावरील रोग नाहीसे होतात. तर याच पावसाचे पाणी सापाच्या तोंडात गेले तर विष होते. व हेच पावसाचे पाणी जर शिंपल्यात गेले तर त्याचा मोती होतो. पाणी सारखेच असते मात्र धारण करणारे कोण आहेत, यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे आपणही या जीवनात जगताना काय केले पाहिजे, काय धारण केले पाहिजे हे ठरवले पाहिजे. मनात, चिंतनात ईश्वर नाम धारण केलं पाहिजे. हा संसार करताना धावपळ, गडबड आहे. जीवन अशांत आहे. परंतु त्यातून मार्ग काढण्यासाठी शांत जीवन, आनंदी जीवन जगण्यासाठी संत महात्म्यांच्या सत्संगामध्ये समरस झालं पाहिजे. जसं समुद्राच्या पाण्याचं उन्हामुळे बाष्पीभवन होतं ,त्यानंतर ढग बनून पाऊस पडतो, पावसाचे पाणी ओढ्या नाल्यात खळखळ वाहते, ते नद्यांना मिळते, नद्या वाहतात, असे हे पाणी शांत नसते, ते अशांत असते, इकडून तिकडे फिरत असते. मात्र नदीचे पाणी समुद्राला मिळाल्यानंतर ते शांत होते. त्याचप्रमाणे या जीवनामध्ये आपले मन अत्यंत चंचल असते .अशांत असते.इकडे तिकडे फिरत असते. मात्र हे जीवन शांत व आनंदी होण्यासाठी आपण साधू संतांना मिळाले पाहिजे. त्यांच्यात समरस झाले पाहिजे. त्यातूनच संतकृपा, सद्गुरू कृपा होत असते व त्यामुळे जीवन सार्थकी लागते. असे अनेक दृष्टांत देत यावेळी ह भ प गणेश महाराज तुपे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. पावसाची शेतकऱ्यांवर कृपा व्हावी. अशी प्रार्थना आपण सगळे मिळून करू असे ते यावेळी म्हणाले. कारण कोणत्याही कंपनीत एक हजार ग्रॅम कच्चामाल दिला तर 900 ग्रॅम पक्के उत्पादन मिळते. मात्र शेतीत एक किलो धान्य पेरले तर एक क्विंटल उत्पादन मिळते. अशी आमची शेती व शेतकरी आहे. त्यामुळे पावसाची शेतकऱ्यांवर कृपा व्हावी अशी प्रार्थना असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
किर्तन संपल्यानंतर महाराजांचा गावकरी मंडळाच्या वतीने रामनाथ सदाफळ यांनी सत्कार केला. तर या दिवशी पंगत देणाऱ्या मुस्लिम समाजातील सर्व पदाधिकारी बंधूंचे हभप गणेश महाराज तुपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ असे व्यक्तिमत्व असणाऱ्या अ फ शेख गुरुजी यांचाही विशेष सन्मान यावेळी महाराजांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हभप तुपे महाराज यांनी म्हटले की श्री साईबाबांनीच सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. आणि ती येथे खरोखर आचरण्यात येत असून हा मोठा आनंद आहे. महाराष्ट्राची ही भूमी संत महात्मांची भूमी आहे. वारकरी संप्रदायात सर्व जाती धर्माचे संत महात्मे होऊन गेले. त्यांनीही आपण सर्व एक आहोत, असा विचार दिला आहे. आणि या विचारावर येथे सर्व समाज बांधव या अखंड नाम सप्ताहात सहकार्य करत आहेत. पंगत देत आहेत. ही आदर्श ठरणारी गोष्ट आहे. असे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक , भजनी मंडळ , पारायणार्थी उपस्थित होते. यावेळी महेश(बापू) नवनाथ जपे यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांचे सरपंच ओमेश जपे यांनी आभार मानले.
किर्तन सेवा- पुष्प पाचवे-
0 Comments