दिलीप शिंदे
सोयगाव दि. ०१-- शेतात झोपलेल्या शेतकऱ्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना दि.३१ सोमवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास वरखेडी बुद्रुक शिवारात घडली.जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी दि.०१ मंगळवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठवण्यात आले. या घटनेमुळे वरखेडी बुद्रुक सह आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. .
याबाबत सविस्तर माहिती अशी, ज्ञानेश्वर वामन लहाने वय ४१ वर्षे रा. वरखेडी बुद्रुक,असे बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान ज्ञानेश्वर वामन लहाने हे वरखेडी शिवारात स्व मालकीचे असलेले गट क्रमांक ६७ मधील शेतात दि.३१ सोमवारी रात्रीच्या वेळी झोपलेले होते. लहाने हे गार झोपेत होते मात्र करवट बदलण्यासाठी लहाने यांनी हालचाल करताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने लहाने यांच्यावर सोमवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास हल्ला केला. हल्ल्यावेळी बिबट्याचा पंजा हा लहाने यांच्या चेहऱ्यावर बसला,यात लहाने हे गंभीर जखमी झाले हिंमत न सोडता लहाने यांनी आरडाओरडा केली. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी विलंब न करता आरडाओरडा करीत लहाने या शेतकऱ्याची बिबट्यापासून सुटका केली. रात्री गावातच उपचार केले त्यानंतर दि.०१ मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जखमी शेतकऱ्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटील,परिचारिका ज्योती आचारे यांनी जखमी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर टाके मारीत प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले.
0 Comments