तस्करांकडून हस्तगत करण्यात आलेल्या त्या दुर्मिळ कासवाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता, अधिवासाला धोका उत्पन्न झाल्याने जलप्रजाती संकटात----




दिलीप शिंदे 
सोयगाव. दि.१६-- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा नोंद झालेल्या कासव तस्करी प्रकरणातील तस्करांकडून हस्तगत करण्यात आलेल्या त्या दुर्मिळ कासवाची त्याच्या नैसर्गिक अधिवासात मंगळवारी सिल्लोड प्रादेशिक वनविभागाने मुक्तता केली. जिल्ह्यातील एका मोठ्या धरणामध्ये त्यास सोडून त्याने आपला निसर्गातील प्रवास व जैव विविधतेमधील भूमिका पुन्हा सुरू केली आहे. अंधश्रद्धेपोटी व भानामती, गुप्तधन आधी गैर कारणांसाठी या दुर्मिळ प्रजातीचा गैर उपयोग अनेक वर्षांपासून होतो आहे. पोलीस विभाग त्या दृष्टीने तपास करत आहे.

-------का झाली आहे कासव प्रजाती संकट ग्रस्त- औद्योगिक क्षेत्रातील वापरलेले रसायने कोणतीही प्रक्रिया न करता ते पाणी सरळ नदी व जलसाठ्यांमध्ये सोडले जाते. पैशाच्या हवेच्या पोटी नुकतेच तोंडापूर व सिल्लोड तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी अशी औद्योगिक रसायन आंध्र प्रदेश गुजरात इत्यादी राज्यांमधून आणून जलसाठ्यांचे आसपास टाकण्यात आली हे जिवंत उदाहरण आहे. बेसुमार वाळू उपसा, नदीकाठी मानवी अतिक्रमण, पाणथळ जागा नष्ट होणे, कासवही अंडी घालण्यासाठी नदीकाठी वास्तव्य करतात. नदीकाठी मानवी अतिक्रमण व मोठ्या वाहनांचा वाळूसाठी राबता यामुळे कासवांची अंडी नष्ट होतात. शौक म्हणून काही शेतकरी विहिरीमध्ये कासव पाळतात ते देखील वन कायद्याने प्रतिबंधित आहे. गुप्तधन व मासासाठीही कासवांची मोठ्या प्रमाणात शिकार होते. जलाशयांच्या लगतच्या पाणथळ जागा नष्ट होत गेल्यानेही कासवांचा अधिवास व प्रजनन धोक्यात आले आहे. सिल्लोड येथील वन्यजीव संवर्धक डॉ.संतोष पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीतील अनेक कासवं नैसर्गिक अधिवासात मुक्त केली आहे.
--------------------------------------------------------------------------------

----------- तस्करांकडून हस्तगत करण्यात आलेले कासव हे " इंडियन सॉफ्ट सेल टर्टल "*( शास्त्रीय नाव-लीथ नीलसोनिया गंगेटीका ) या भारतीय प्रजातीचे व गोड्या पाण्यात अधिवास करणारे असून, ते भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या वनसंरक्षक कायद्याने अनुसूची क्रम एक मध्ये संरक्षित वन्यजीव असून,साइट्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अपेंडिक्स एक मध्ये नोंद व संरक्षण प्राप्त असून जागतिक स्तरावर आय. यु. सी. एन .च्या यादीत रेड कार्ड मध्ये संकटग्रस्त( इनडेंजर्ड) म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. जल परिसंस्थेमध्ये या कासवाची महत्त्वाची भूमिका ही" स्कॅवेंजर्स ( स्वच्छता रक्षक) म्हणजे पाण्यातील मृत झालेले सेंद्रिय घटक व मृत,कुजलेले मासे व पाण्यात पडलेले अथवा टाकलेले मृत जनावरे व मांस खाऊन जल संस्थेची स्वच्छता ठेवून पाण्याचे आरोग्य व अन्नसाखळी सुदृढ व अबाधित राखनारा हा वन्यजीव आहे. लहान मासे, लहान बेडूक, टोड, जल कीटक, गोगलगाय, अष्टपादवर्गीय कीटक, इ. जीवांवर उपजीविका करणारी ही प्रजाती त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून निसर्गात समतोल राखते.भानामती व अंधश्रद्धेपायी या कासवाची मोठ्या प्रमाणात तस्करी व हत्या होणे ही गंभीर बाब असल्याचे वन्यजीव संवर्धक डॉ.संतोष पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

0 Comments