त्रिमूर्ती विद्यालयात विद्युत सुरक्षा व हरित ऊर्जेबाबत मार्गदर्शन



टाकळीभान प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने ‘ऊर्जाबचत, हरित ऊर्जा व विद्युत सुरक्षा’ या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम त्रिमूर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे आयोजित करण्यात आला.
     यावेळी सुरेश पासवान, सहाय्यक अभियंता यांनी विद्यार्थ्यांना विद्युत उपकरणे सुरक्षितपणे हाताळण्याबाबत मार्गदर्शन केले. ओल्या हाताने विद्युत उपकरणांना हात लावू नये, खराब अथवा तुटलेल्या विद्युत तारांचा वापर करू नये, एका सॉकेटमध्ये अनेक उपकरणे जोडू नयेत, उपकरणांचा वापर झाल्यानंतर स्विच बंद करावा, तसेच विद्युत बिघाड झाल्यास स्वतः दुरुस्ती न करता शिक्षक किंवा प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनची मदत घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या.
    तसेच विद्युत अपघात घडल्यास तातडीने वीजपुरवठा बंद करून मोठ्यांची मदत घ्यावी, शाळेत एमसीबी व अर्थिंगची योग्य व्यवस्था असावी, याबाबतही माहिती देण्यात आली. वीजबचत, सौरऊर्जेचा वापर आणि पर्यावरणपूरक हरित ऊर्जेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
   यावेळी देविदास पाटील चिंधे-लाईनमन; कैलास घोळवे-सिनियर टेक्निशियन; आकाश पठारे- वायरमन; अविनाश रणनवरे-वायरमन उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा प्राचार्य संतोष जावळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र डिके यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्युत सुरक्षेबाबत प्रश्न विचारले. ‘वीज सुरक्षितपणे वापरा, ऊर्जा वाचवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

Post a Comment

0 Comments