पाणी टंचाई निवारणासाठी संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करण्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश




अहिल्यानगर, दि. ११ (जिमाका) : पावसा अभावी शेती तसेच पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासनातील प्रत्येक विभागाने संवेदनशीलता आणि समन्वय ठेवून काम करावे. टंचाईग्रस्त गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी गावोगावी प्रत्यक्ष दौरे करून नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करावे. योजनांचे काम केवळ नियम अथवा प्रक्रियेच्या अडचणीमुळे प्रलंबित ठेवण्याऐवजी त्यावर व्यवहार्य पर्याय सुचवावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

पाथर्डी नगरपरिषदेच्या कार्यालयात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन आदी विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*पाणीपुरवठ्याचे एकत्रित नियोजन करण्याच्या सूचना*

पाथर्डी शहर तसेच तालुक्यातील अनेक गावे विविध पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून आहेत. शहराची पाण्याची गरज आणि ग्रामीण भागातील गावांची आवश्यकता लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे एकत्रित व प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पाणीपुरवठा योजनेवर कार्यरत असलेल्या पंपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कार्यवाही करावी. नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यासाठी सध्या असलेला पाणीपुरवठ्याचा कालावधी दहा दिवसांपेक्षा कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या टाक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्या ठिकाणी पाण्याचा उद्भव आहे, तेथूनच पाणी शुद्धीकरण करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दर्शवली.

*पशुधनासाठी चारा उपलब्धतेचेही काटेकोर नियोजन*

टंचाईच्या काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने परस्पर समन्वयाने नियोजन करावे. प्रत्येक गावात भविष्यात किती चारा आवश्यक आहे, याची माहिती संकलित करून त्यानुसार नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

*‘कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’*

टंचाई परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून आढावा न घेता प्रत्यक्ष गावांमध्ये जावे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. ‘लोकांसाठी आता कार्यालयाच्या बाहेर पडा’, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी गावोगावी भेटी देऊन टंचाई परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घ्यावी. उपलब्ध पाणी, टँकरची आवश्यकता, चाऱ्याची गरज तसेच नागरिकांच्या अन्य समस्यांचा आढावा घ्यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व उपाययोजनांचा नियमितपणे आढावा घेऊन संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

टंचाईच्या काळात पिण्याचे पाणी, शेतीसाठी आवश्यक पाणी आणि पशुधनासाठी चारा यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे. शेतकरी आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी उपलब्ध साधनसामग्री व निधीचा प्रभावी वापर करून तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

००००००

Post a Comment

0 Comments