योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज व समर्थ सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर येथून श्रीक्षेत्र पुणतांबा असा पायी दिंडी एकदिवसीय सोहळा रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या दिंडीचे मार्गदर्शक व प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा नुकताच ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पुणतांबा असा पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी आठ वाजता श्री रोकडेश्वर हनुमान मंदिर श्रीक्षेत्र भऊर येथून या दिंडी सोहळ्याचे रथ पूजन व श्रींचे पूजन करून प्रस्थान होणार असून याच दिवशी आषाढ कृष्ण कामिका एकादशीला दुपारी हा दिंडी सोहळा श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पोहोचणार आहे. श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पवित्र गोदास्नान व गंगापूजन, आरती, दर्शन, आदी धर्मिक कार्यक्रम होणार आहे. तसेच रस्त्याने अभंग, भजने, भक्ती गीते,गवळणी, टाळ मृदंगाच्या निनादात नाचत गात हा दिंडी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. या पायी दिंडी वारीला मोठे महत्त्व आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला यात्रा झाल्यानंतर आषाढ महिन्यातील पुढील पंधरा दिवसांनी येणाऱ्या कृष्ण पक्षातील एकादशीला श्रीक्षेत्र पुणतांबा येथे मोठी यात्रा भरते. श्रीक्षेत्र पुणतांबा हे गोदा किनारी वसलेले पुरातन व प्रसिद्ध असे धार्मिक तीर्थक्षेत्र असून येथे योगीराज सद्गुरु चांगदेव महाराजांची संजीवन समाधी आहे. तसेच श्री काशी विश्वनाथ मंदिर, प्रसिद्ध देवी मातेचे मंदिर असून श्री कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. त्याचप्रमाणे विविध छोटे-मोठे अनेक मंदिरे नदीच्या किनारी असून प्रसन्न व अध्यात्मिक असे येथे वातावरण आहे. या एकादशीला पंढरपूर वरून पांडुरंग स्वतः येथे येतात. असे भाविकांची श्रद्धा आहे. अशा पवित्र व प्रसिद्ध श्री क्षेत्र पुणतांबा येथे रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी मोठी यात्रा भरत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक छोट्या मोठ्या दिंड्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे येणार आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ज्यांना वारीला जाता आले नाही ते श्रीक्षेत्र पुणतांब्याची पायी वारी करतात . तसेच जे पंढरपूरला पायी वारीत गेलेले असतात. ते सुद्धा श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पायी वारी करून खऱ्या अर्थाने आपल्या पायी वारीची सांगता करतात. त्यामुळे श्रीक्षेत्र पुणतांबा येथे मोठ्या संख्येने वारकरी येत असतात .अशाच प्रकारे श्रीक्षेत्र भऊर येथून श्रीक्षेत्र पुणतांबा साठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वारकऱ्यांसाठी हि पायी वारी आयोजित केली असून रविवार नऊ ऑगस्ट रोजी श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात पूजा करून या पायी दिंडी वारीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान होणार आहे. रस्त्यामध्ये काही अन्नदात्याकडून चहा, फराळ होणार असून रस्त्याने भजन, पूजन आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तरी या दिंडी सोहळ्याचा, धार्मिक कार्यक्रमांचा वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहनही प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी केले आहे. मार्गदर्शनाखाली आयोजन!
0 Comments