टाकळीभान प्रतिनिधी : त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, घोगरगाव येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयात विविध देशभक्तीपर, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याकार्यक्रमाची सुरुवात सकाळी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व ग्रामस्थांनी काढलेल्या आकर्षक प्रभात फेरीने झाली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” तसेच विविध देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. मेजर श्री. दिलीप लक्ष्मण शिरसाठ (नायक, इंडियन आर्मी) हे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री संतोष जावळे ,आप्पासाहेब शिंदे पाटील (सरपंच), सदाशिव बहिरट पाटील (माजी सरपंच), राजू साप्ते पाटील (माजी उपसरपंच), सतीश पाटील पठारे (कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन), राधाकिसन साप्ते पाटील (माजी व्हा. चेअरमन), दत्तू पाटील बहिरट (माजी उपसरपंच), प्रशांत बहिरट पाटील नितीन पाटील शेळके (पत्रकार), रावसाहेब पाटील आव्हाड, रामराव बहिरट पाटील ,सुलतान भाई शेख, दिलावर पठाण, बबन पाटील पर्हाड यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वसतिगृहपालक ज्ञानोबा गव्हाणे व सखाराम बनकर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, त्यांचे बलिदान आणि राष्ट्राप्रती असलेली आपली जबाबदारी याबाबत प्रभावी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी भाषणांना उपस्थित पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, उत्कृष्ट सैनिकी पथसंचलन, कवायत संचलन, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक आणि प्रभात फेरी हे होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून शिस्त, धैर्य, संघभावना व राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला.
५१ शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा गौरव
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एनएमएमएस तसेच इयत्ता पाचवी, सातवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या एकूण ५१ विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे द्योतक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव होत असताना उपस्थित पालक व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना भविष्यातही सातत्याने अभ्यास करून मोठे यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
भारतीय सैन्यात देशसेवा बजावणारे मा. मेजर श्री. दिलीप लक्ष्मण शिरसाठ यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा, शिस्त व राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना जगताप यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी गारुळे व रेखा दिवे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. हरिश्चंद्र डिके यांनी केले.
ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध, सुंदर व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.
0 Comments