सिंहस्थ महाकुंभाचा भक्ती संगम सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न!



 नाशिक- त्रिंबक चा कुंभमेळा न भूतो न भविष्यती असा होणार--महंत आत्माराम गिरीजी महाराज

शिर्डी ( प्रतिनिधी)
नाशिकच्या पावन भूमीत आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या भक्तिमय वातावरणाला प्रारंभ करून देणारा “सिंहस्थ महाकुंभ – भक्ती संगम” हा भव्य आणि ऐतिहासिक सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण, मंगलमय आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू असून हा कुंभमेळा न भूतो न भविष्यती असा होणारच असे मत या भक्ती संगम सोहळ्याला उपस्थित असणारे श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत‌ व जुन्या आखाड्याचे स्वामी प.पू. संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी कुंभमेळा मंत्री मा. नामदार श्री. गिरीशजी महाजन यांच्यासह शासनातील अनेक मान्यवर, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म, संतपरंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा विराट संगम आहे. या भावनेचे दर्शन या भक्ती संगम सोहळ्यात प्रकर्षाने घडले. विविध आखाड्यांचे साधू-महंत, महामंडलेश्वर, वारकरी संप्रदायातील संत, भागवत धर्माचे आचार्य, साधुसंत तसेच देशभरातून आलेले असंख्य भाविक या सोहळ्याला उपस्थित होते.
विविध संतपरंपरा, आखाडे आणि भक्ती संप्रदाय एकाच व्यासपीठावर एकत्र येणे ही नाशिकच्या भूमीसाठी अत्यंत अभिमानाची आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बाब ठरली. भक्ती, ज्ञान, साधना आणि सनातन संस्कृतीच्या विविध प्रवाहांचा येथे सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.
या ऐतिहासिक आणि मंगलमय सोहळ्यात स्वामी आत्मारामगिरी  यांनाही सहभागी होण्याचा आणि प्रत्यक्ष उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचा लाभ मिळाला. या भक्ती संगम कार्यक्रमात उपस्थित संत-महंत, साधुसंत आणि भाविकांच्या सान्निध्यात या भक्ती संगमाचा अनुभव घेणे हा निश्चितच एक अविस्मरणीय आध्यात्मिक क्षण ठरला. असे सांगत मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी पुढे म्हटले की, यावेळी येथे
संतांच्या उपस्थितीने आणि हरिनामाच्या भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या भव्य आयोजनाची जणू ही मंगलमय नांदीच ठरली.
सनातन संस्कृतीच्या विराट संगमाची हि नांदी होती.
नाशिक-त्र्यंबकेश्वर ही भूमी भगवान त्र्यंबकेश्वराच्या पावन सान्निध्याने आणि गोदावरीच्या पवित्र प्रवाहाने आधीच पवित्र झालेली आहे. या भूमीवर होणारा सिंहस्थ महाकुंभ हा कोट्यवधी श्रद्धाळूंसाठी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
नाशिक येथे नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या “भक्ती संगम” सोहळ्याने या महाकुंभाची आध्यात्मिक पायाभरणी अधिक भव्य केली. साधुसंत, वारकरी, भागवत धर्माचे आचार्य, विविध आखाड्यांचे महंत आणि भाविक यांच्या एकत्रित उपस्थितीत “एकात्मता, भक्ती आणि सनातन संस्कृती” यांचा संदेश संपूर्ण समाजाला मिळाला.
हा सोहळा केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम न राहता संतपरंपरा, भक्ती आणि भारतीय संस्कृतीच्या विराट शक्तीचे दर्शन घडविणारा महासोहळा ठरला असून हा आगामी नाशिक त्रिंबकचा कुंभमेळा असाच  न भूतो न भविष्य असा होईल. असे मत श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत व जुन्या आखाड्याचे परमपूज्य संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments