शासकीय यंत्रणेची व्यवस्था बदलण्यासाठी शेतकरी संघटनेची गरज




टाकळीभान प्रतिनिधी: शासकीय यंत्रणेची व्यवस्था बदलण्यासाठी त्यामध्ये सहभागी होऊन आपण अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे आपले प्रश्न मांडून शासकीय यंत्रणेची व्यवस्था सुधारू शकतो असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजितराव काळे यांनी केले. शेतकरी संघटनेचे प्रभारी व प्रवक्ते प्रा.कार्लस साठे सर व बेलपिंपळगाव जिल्हा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार माजी उपसरपंच बंडोपंत चौगुले यांच्या पुढाकारातून प्रा. साठे यांच्या फार्म हाऊसवर , बेलपिंपळगाव ता. नेवासा येथे शुक्रवार दि.३१ जुलै रोजी शेतकरी संघटनेची बैठक व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 याप्रसंगी ॲड काळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते हरीअप्पा तुवर, राष्ट्रवादी किसान सभा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे,साहेबराव चोरमल, नेवासा तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे, ज्येष्ठ नेते वसंतराव शेरकर, शरद आसने, भास्कर मुठे, बी. डी.शिंदे सर, खंडेराव सरोदे, पत्रकार भाऊसाहेब काळे आदी प्रमुख उपस्थित होते.
 शेतकऱ्याच्या कष्टाच्या दामासाठी व हक्कासाठी शेतकरी संघटना लढत असून आमचा कोणी शत्रू व मित्र नाही शेतकऱ्यांचा हिताचा जो निर्णय घेईल त्यांना आम्ही साथ देऊ असे काळे यांनी स्पष्ट केले. प्रथमता शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी करणारी शेतकरी संघटना असून त्याला सर्वच विरोधक पक्षाच्या गटांनी मागणी लावून धरल्याने सरकारने काही प्रमाणात कर्जमाफी केली, ती आम्हाला मान्य नसून सरकारच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन निवडणुकी वेळी सरकारने दिले होते. ते आश्वासन त्यांनी पाळले नाही व शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. शेतकरी कष्ट करतो, शेतीसाठी खर्च करतो पण त्याला आपल्या हक्काचे दाम मिळत नाही, बऱ्याच वेळेला त्यांनी उत्पादन खर्च केलेल्या रकमेपेक्षाही त्याच्या मालाला कमी भाव मिळतो. त्यामुळे त्याचे सर्व आर्थिक गणित बिघडते व तो कर्जाच्या खाईत जातो. तो आपल्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण, मुलांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च, मुलांचे लग्न कार्य यासाठी खर्च करण्यास शेतकरी हतबल होतो. यास सर्वस्वी सरकारचे चुकीचे धोरण अवलंबून असून गेल्या पन्नास वर्षापासून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्ग मागासलेला राहिला आहे. व त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल व्हायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, बारा तास सुरळीत वीज, व संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी या शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागणी असून यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणे ,आंदोलन करणे व शासकीय यंत्रणेत आपले काही प्रतिनिधी पाठवून ही व्यवस्था बदलण्यासाठी शेतकरी संघटनेची गरज असून शेतकरी संघटनेच्या पाठीशी शेतकऱ्यांनी भक्कम उभे राहावे असे आवाहन यावेळी अजित काळे यांनी केले. यावेळी प्रास्ताविक करताना प्रा. कार्लस साठे सर म्हणाले की ना कोणता पक्ष, ना कोणती जात, ना कोणता धर्म फक्त शेतकरी म्हणून एकत्र या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी हरियाप्पा तुवर, राजेंद्र कोकणे, साहेबराव चोरमल, मेजर अशोक काळे, पत्रकार भाऊसाहेब काळे, गणेश चौगुले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शेतकरी मेळाव्याप्रसंगी सतीश नाईक, भागवतराव चौगुले,बाळासाहेब शिरसाट, शिवाजी चौगुले, शिवाजीराव कांगूने, वसंतराव भद्रे, भारत चौगुले, दीपक चौगुले, अनिल बोडखे ,सुजित बोडखे, अरविंद साळवे, भाऊसाहेब गव्हाणे, फ्रान्सिस साठे, पोपट पुंड, दीपक चौगुले, शिवाजी जाधव, गुलाब भाई पठाण, बाळासाहेब खांडे, संदीप कोकणे, शिवाजी वरघुडे, राजु आघाडे, बाळासाहेब भद्रे, वसंत साठे, पुंडलिक सरोदे, शिवाजी जाधव,अण्णा बर्डे, गणेश कोकणे आदीसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव ग्रामस्थ व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.यावेळी बी. डी.शिंदे सर यांनी सर्वांचे उपस्थितीबद्दल आभार मानले.
चौकट: सद्यस्थितीला कोणताही पक्ष शेतकऱ्यांच्या व जनतेच्या प्रश्नांसाठी कोणताही मेळावा व बैठक घेत नाही व त्यांचे प्रश्न जाणून घेत नाहीत ही शोकांतिका असून शेतकरी संघटना मात्र वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेते व विविध आंदोलने करून ते सोडवण्याचा प्रयत्न करते..
    ॲड.अजितराव काळे(राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना)

Post a Comment

0 Comments