श्री क्षेत्र रुई येथे 133 वा अखंड हरिनाम सप्ताहाचे सोमवार दिनांक 17 ते मंगळवार 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजन!

शिर्डी( प्रतिनिधी)- 
राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र रुई (कोहकी) येथे श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी सन 1894 साली घालून दिलेल्या संकेतानुसार सालाबाद प्रमाणे यावर्षीही सोमवार 17 ऑगस्ट ते मंगळवार 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत 133 वा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती हरिनाम सप्ताह कमिटी व समस्त गावकरी मंडळ श्रीक्षेत्र रुई ( कोहकी) यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी सन 1894 साली घालून दिलेल्या संकेतानुसार हा 133 वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र रुई येथे होत असून या हरिनाम सप्ताहाला त्यामुळे अध्यात्मिक दृष्टीने खूप मोठे महत्त्व आहे. अशा या 133 व्या श्रीक्षेत्र रुईतील अखंड हरिनाम सप्ताहाचे मंगल कलश स्थापना, पंचदीप प्रज्वलन, तसेच ग्रंथ ,विना,, टाळ व मृदंग पूजन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम ,निमगाव येथील मठाधिपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री काशिकानंद महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. या हरिनाम सप्ताह काळामध्ये दररोज पहाटे साडेचार ते सहा कालावधीत काकडा भजन ह भ प गोविंद महाराज पाटील( बीड) व भजनी मंडळ, रुई यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच दररोज सकाळी सात ते अकरा यादरम्यान व्यासपीठ चालक ह भ प नितीन महाराज हरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. तसेच सकाळी साडेअकरा ते बारा गाथा भजन, दुपारी एक ते तीन या कालावधीत वारकरी नियम भजन, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते 11 या दरम्यान श्रीहरी कीर्तन व नंतर हरीजागर होणार आहे. या सप्ताह कालावधीमध्ये सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी बाल कीर्तनकार ह भ प माऊली महाराज जाहूरकर यांचे कीर्तन होणार असून मंगळवार 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख ,इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच बुधवार 19 ऑगस्ट रोजी ह भ प अण्णा महाराज चव्हाण ,दिंडोरी तर गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी ह भ प ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार 21 ऑगस्ट 2026 रोजी ह भ प गोरक्षनाथ महाराज देठे तर शनिवार 22 ऑगस्ट 2026 रोजी हभप रूपालीताई सावने महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तर रविवार 23 ऑगस्ट 2026 रोजी पिंपळवाडी येथील हभप मधुसूदन महाराज तर सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आळंदी देवाची येथील अर्जुन महाराज चौधरी यांचे किर्तन होणार आहे.हे दररोज रात्री नऊ ते 11 या वेळेत जाहीर हरिकीर्तन होणार आहे. तर मंगळवार 25 ऑगस्ट 2026 या हरिनाम सप्ताह च्या शेवटच्या दिवशी ह भ प पांडुरंग महाराज गिरी यांचे काल्याचे किर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.व रात्री नऊ वाजता नाद विनोदी भारुडाचा- जुगलबंदी हा भारुडाचा कार्यक्रम ह भ प पांडुरंग गवळी, संभाजी झरे, रघुनाथ बिरादार यांचा होणार आहे. 
या हरिनाम सप्ताह काळात हरिपाठ व किर्तनाला ह भ प संतोष महाराज दीक्षित, संस्थापक नादब्रह्म अध्यात्मिक शिक्षण संस्था, पिंपळस राहता यांचे विद्यार्थी तसेच साध्वी सोनाली दीदी, अध्यक्षा ,अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था (चकलंबा )येथील सर्व विद्यार्थिनी यांची साथ राहणार आहे. तसेच मृदंगाचार्य हभप संतोष महाराज दीक्षित,व ह भ प नितीन महाराज हरकळ, गायनाचार्य हभप रामकृष्ण महाराज चौधरी व ह भ प उद्धव महाराज शिंदे यांची साथ राहणार आहे. चोपदार म्हणून हभप भिकाजी शंकरराव वाबळे व ह भ प रमेश लक्ष्मणराव कामठे हे असणार आहेत.
असे या पत्रकात म्हटले असून वेळेनुसार कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार सप्ताह कमिटीकडे राखून ठेवण्यात आलेला आहे तसेच रुई येथील श्री महारुद्र हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे बांधकाम चालू असून या ईश्वरी कार्यास सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे श्रीक्षेत्र रुई येथील हरिनाम सप्ताह कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ रूई- कोहकी यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments