श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ पुर्वपिठीकाइतिहास.. शिर्डीच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा


"
शिर्डी (राजकुमार गडकरी)-
श्री साईसच्चरित्राच्या" १७ व्या अध्यायात हेमाडपंतानी गुरुचे महत्व विशद केलेले आहे. हेमाडपंत म्हणतात, 'नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे, विश्वासपुर्वक सदगुरुवचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरुंनी सांगितलेली आचारपध्दती लक्षात ठेवून लोक आपल्या उध्दाराचा मार्ग निवडतात. गुरुच्या उपदेशाने असंख्य लोकांचा उध्दार होतो आणि त्यांचा मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. श्री साईबाबांना देश-विदेशातील लाखो साईभक्त गुरु मानतात. शिडींतही दिनांक २८ जुलै २०२६ ते दिनांक ३० जुलै २०२६ याकाळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने श्री साईबाबा आणि श्री गुरुपौर्णिमा यांची महती सांगणारा विशेष लेख
*नुलकरांचे निमित्त-गुरुपौर्णिमेस प्रारंभ*
श्री साईबाबांचे निस्सिम भक्त तात्यासाहेब नुलकर हे त्यांची आई व सासू यांना घेऊन शिर्डीत आले होते.

 त्याच दरम्यान गुरुपौर्णिमा असल्याने तात्यासाहेब नुलकरांनी पौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा केली. पूजा करुन तात्यासाहेव नुलकर निघून गेल्यानंतर बाबांनी तात्या पाटील कोते यांना बोलावणे पाठविले. बाबांचे बोलावणे आले त्यावेळी तात्या पाटील कोते हे आपल्या शेतावर काम करत होते. बाबांचे बोलावणे आल्यानंतर लगेचच ते बाबांकडे आले. त्यावेळी बाबा तात्या पाटील कोतेंना म्हणाले, 'तो काय एकटा माझी पूजा करतो, तुला करायला काय झाले?" भक्तांच्या मनात इच्छा असूनही बाबा रागावतील म्हणून त्यांची गुरु म्हणून पूजा करण्याचे धाडस कोणी दाखवत नसे. परंतु आता बाबांनीच अप्रत्यक्ष संमती दिल्याने तात्या पाटील कोते व तेथे उपस्थित असलेले माधवराव देशपांडे वगैरे भक्तांना खूप आनंद झाला. तदनंतर दादा केळकर जेष्ठ असल्याने त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा करण्याचा मान देण्यात आला. त्यांनी व्दारकामाईत जावून गंध, अक्षदा, हार, फुले, धोतरजोडी घेवून जावून बाबांची यथाविधी पूजा केली. तेंव्हापासून साईभक्त गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करु लागले.
*गुरु ज्ञानसागारु*
श्री साईसच्चरित्राच्या १७ व्या अध्यायात हेमाडपंतांनी सद्गुरूंचे महत्त्व विशद केले आहे. सद्गुरूंच्या उपदेशाने आत्मज्ञान, मोक्षमार्ग आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. श्रद्धा, नम्रता, गुरुसेवा आणि गुरुवचनाचे पालन यांमुळेच शिष्याला ज्ञानप्राप्ती होते. गुरुविना खरे ज्ञान प्राप्त होत नाही, म्हणून अहंकाराचा त्याग करून पूर्ण विश्वासाने सद्गुरूंच्या चरणी शरण जाणे, हाच आत्मकल्याणाचा आणि मोक्षप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे साईचरित्रात सांगितले आहे.
*साईनाथ गुरु माझे आई* 
श्री साईसच्चरित्राच्या १८ व्या अध्यायात हेमाडपंतांनी वर्णन केले आहे की, श्री साईबाबा प्रत्येक भक्ताला त्याच्या पात्रतेनुसार निष्काम भावनेने योग्य उपदेश करीत असत. त्यांचा उपदेश सर्वांसाठी खुला असून सद्गुरूंचे ज्ञान हे सर्वांच्या कल्याणासाठी आहे, असा त्यांचा संदेश होता. आई जशी लेकराचे प्रेमाने संगोपन करते, त्याप्रमाणे बाबा आपल्या भक्तांचे प्रेमपूर्वक मार्गदर्शन करून त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सुलभ करीत. सद्गुरूंचा सहवास हा जीवनातील सर्वोच्च लाभ असून गुरुसेवा, श्रद्धा आणि भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते. गुरु हे ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच साक्षात परब्रह्मस्वरूप आहेत. तेच भक्तांना प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही मार्गांचे योग्य मार्गदर्शन करून जीवनाला अर्थपूर्ण दिशा देतात.
*बाबांचे गुरुस्थान..गुरुस्‍थानी बाबा* 
श्री साईबाबा प्रथम शिर्डीत निंबवृक्षाखाली ध्यानस्थ अवस्थेत दिसले. हे स्थान आपल्या गुरूचे असून अत्यंत पवित्र व प्रिय असल्याचे बाबा सांगत असत. गुरुवार व शुक्रवारी येथे श्रद्धेने उद जाळल्यास कल्याण होते, अशी या गुरुस्थानाची महती त्यांनी सांगितली. बाबा स्वतः गुरुपूजा करून घेत नसत; मात्र ज्यांनी त्यांना सद्गुरू मानून भक्तिभावाने पूजा केली, त्यांच्या भावनेचा त्यांनी नेहमीच आदर केला. त्यामुळे शिर्डीतील गुरुस्थान आजही साईभक्तांसाठी श्रद्धा, गुरुभक्ती आणि अध्यात्माचे प्रेरणास्थान मानले जाते.
*सच्चरित्रातील गुरुमहात्म्य*
श्री साईसच्चरित्राच्या १८ व्या अध्यायाच्या शेवटी व १९ व्या अध्यायाच्या प्रारंभी हेमाडपंतांनी राधाबाई देशमुख यांच्या प्रसंगातून गुरुमहात्म्याचे महत्त्व सांगितले आहे. श्री साईबाबांना सद्गुरू मानून त्यांनी उपदेश मिळेपर्यंत अन्न-पाण्याचा त्याग केला. त्यांच्या दृढ श्रद्धेने प्रसन्न होऊन बाबांनी त्यांना "श्रद्धा आणि सबुरी" हेच सद्गुरूंकडे अर्पण करावयाचे खरे दोन पैसे असल्याचा अमूल्य उपदेश केला. धैर्य, संयम, दृढ विश्वास आणि गुरूवरील अखंड निष्ठा यांमुळेच आत्मकल्याण व मोक्षप्राप्ती होते, असा साईबाबांचा संदेश या प्रसंगातून अधोरेखित होतो.
*गुरुगृही साईनाथ*
श्री साईसच्चरित्रात श्री साईबाबांनी आपल्या गुरूच्या सहवासातील अनुभव सांगताना गुरुसेवा, गुरुभक्ती आणि गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले आहे. बारा वर्षे गुरूच्या चरणी राहून त्यांनी प्रेम, श्रद्धा आणि पूर्ण समर्पणाचा आदर्श अनुभवला. "तू माझ्याकडे अनन्यपणे पाहा आणि मी तुझ्याकडे पाहीन," हा गुरूचा संदेशच जीवनातील सर्वश्रेष्ठ उपदेश असल्याचे बाबांनी सांगितले. दृढ श्रद्धा, सबुरी आणि गुरूवरील अखंड विश्वास यांमुळेच परमार्थ, आत्मज्ञान आणि जीवनाचे खरे कल्याण साध्य होते, असा अमूल्य बोध त्यांनी राधाबाईंना दिला.
*श्री साईबाबांची शिकवण*
श्री साईबाबांनी परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे कर्तव्य करणे, कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करणे, सर्वांशी प्रेमाने वागणे, वाद-विवाद, निंदा व अहंकार टाळणे आणि सदैव सद्विवेक जागृत ठेवणे, अशी शिकवण दिली. त्यांनी देवाचे नामस्मरण, सत्संग, ग्रंथवाचन, नियमित आचार-विचार आणि परोपकार यांना महत्त्व दिले. इतरांच्या दोषांवर टीका करण्याऐवजी त्यांच्याबद्दल करुणाभाव बाळगावा आणि स्वतःचे आचरण शुद्ध ठेवावे, हाच त्यांच्या जीवनतत्त्वज्ञानाचा मूलभूत संदेश आहे.
*श्री साईबाबांच्या मुखातील वचनावली*
श्री साईबाबांनी आपल्या वचनांतून भक्तांना अखंड श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाचा संदेश दिला. "मी जरी गतप्राण झालो तरी माझे वचन प्रमाण आहे," असे सांगत त्यांनी समाधीनंतरही आपल्या भक्तांचे रक्षण व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. परमेश्वर सर्वत्र व्यापून आहे, प्रत्येक कृतीवर त्याची दृष्टी आहे आणि जो भक्त अनन्य भावाने त्यांचे स्मरण करतो त्याचे कल्याण निश्चित होते, असा विश्वास त्यांनी भक्तांच्या मनात दृढ केला. त्यांच्या मते संपूर्ण चराचर सृष्टी ही ईश्वरस्वरूप असून श्रद्धा, नामस्मरण आणि सदाचार हाच जीवनकल्याणाचा खरा मार्ग आहे.
यंदाचा श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शिवाजी कचरे, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी    व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकिय अधिकारी, विभागप्रमुख, संरक्षण अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments