समग्र शिक्षा शिक्षण विभाग व पंचायत समितीच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व साहित्य वाटप ----




दिलीप शिंदे 
 सोयगाव दि. २५ -- समग्र शिक्षा शिक्षण विभाग, पंचायत समिती सोयगाव यांच्या वतीने ३ ते १८ वयोगटातील प्रमाणपत्रधारक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दि.२५ शनिवारी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी, अलिम्को साहित्य वितरण व मोजमाप शिबिर उत्साहात पार पडले. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.
पंचायत समितीच्या बचत भवन येथे शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित शिबिराचे उद्घाटन सोयगाव तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मिन्नू पी.एम., शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या प्रेरणेने तसेच गटविकास अधिकारी अमोल जगताप, गटशिक्षणाधिकारी अक्षय धंदर आणि समग्र शिक्षाचे गट समन्वयक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात अलिम्को संस्थेमार्फत १२ दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच ६३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय ४८ विद्यार्थ्यांचे अलिम्कोच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून साहित्य साधनांसाठी मोजमाप व नोंदणी करण्यात आली. यापैकी पात्र ठरलेल्या ३३ विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.यावेळी अलिम्को संस्थेचे प्रतिनिधी डॉ. नेहांश मेहता, डॉ. सुशील सिंग, डॉ. मयूर वर्मा, डॉ. एशस चुंबळे तसेच एचआरएचएमचे डॉ. झकी आणि जिल्हा समन्वयक गणेश बेडके उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समग्र शिक्षा शिक्षण विभागातील विशेष तज्ज्ञ व विशेष शिक्षक सुनिल बावचे, जगन्नाथ काकडे, कैलास लांडगे, हाफीजोद्दीन शेख, संगीता पाटील, प्रतिज्ञा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच लेखा विभागाचे प्रमुख माऊली पाटील, आस्थापना विभागाचे प्रमुख प्रविण वाघ, भिकन पाटील, सुनिल शेटे, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, देवेंद्र पाटील, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भरत पगारे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.तालुक्यातील आठ केंद्रांमधून एकूण ११३ दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शिबिरात सहभाग नोंदविला. आरोग्य तपासणी, साहित्य वितरण व मोजमाप या तिन्ही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सहाय्यभूत साहित्य वेळेत उपलब्ध झाल्यास त्यांच्या शिक्षणाबरोबरच दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments