माणिकराव पालोदकर इंग्लिश स्कूलमध्ये अजान वृक्षाचे रोपण, विठ्ठल नामाच्या गजरात भरली भक्तीमय शाळा--




दिलीप शिंदे 
सायगाव, दि.२६ -- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिल्लोड येथील माणिकराव पालोदकर इंग्लिश स्कूलमध्ये अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळावरील अजान वृक्षाचे रोप विकसित करणारे निसर्गप्रेमी अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात अजान वृक्षाचे रोपण करण्यात आले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. रूपाली पालोदकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सिल्लोड शहरातील प्रसिद्ध वनस्पती व पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा फुके यांची प्रमुख उपस्थिती होती.वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री. विठ्ठलाची प्रतिमा आकर्षक पालखीत विराजमान करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर शाळा व महाविद्यालयाच्या परिसरातून विद्यार्थ्यांनी उत्साहात वारकरी दिंडी काढत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. टाळ, मृदंग आणि वीणेच्या गजरात दुमदुमलेला परिसर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि विद्यार्थ्यांच्या वारकरी पावलींनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच भारतीय संस्कृतीतील अजान वृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. चित्रकला शिक्षिका शालिनी मोरे यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्री. विठ्ठलाची देखणी प्रतिमा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल व माता रुक्मिणीचा पारंपरिक वेश परिधान करून साकारलेली मनमोहक प्रस्तुती. "ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी, ज्ञानाची पताका खांद्यावरी" या भावनेने प्रेरित बाल वारकऱ्यांनी टाळ, वीणा आणि मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत अध्यात्म, भक्ती, ज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. त्यामुळे संपूर्ण शाळा विठ्ठलभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली.या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, ज्ञानसंस्कार, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेप्रती आदरभाव निर्माण करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित पालक, मान्यवर आणि नागरिकांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

Post a Comment

0 Comments