जि. प. सदस्या पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या पुढाकारातून सोयगाव पर्यटन विकास प्रस्ताव सादर,पर्यटन उपसंचालकांकडून पायाभूत सुविधांचे आश्वासन---



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१५-- सातमाळा डोंगररांगेतील समृद्ध ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचा विकास करून सोयगाव तालुक्याच्या स्थानिक पर्यटनाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली पर्यटन संचालनालय कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत संभाजीनगर जिल्ह्यातील ट्रेकर्स आणि टूर ऑपरेटर्सच्या वतीने सोयगाव पर्यटन विकास प्रस्ताव अधिकृतपणे सादर करण्यात आला.

     दरम्यान जि. प. सदस्या पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे यांनी सादर केलेल्या या प्रस्तावामध्ये सोयगाव परिसरातील प्रमुख १४ पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासाची मागणी करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने वेताळवाडी, वसई, सुतांडा/नायगाव, अंतूर आणि जंजाळा या पाच ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे. यासोबतच प्रसिद्ध घटोत्कच लेणी, रुद्रेश्वर लेणी, मंदिर धबधबा, मनुदेवी मंदिर व धबधबा आणि काळदरी गाव भ्रमंती (व्हिलेज टूरिझम) या पर्यटन घटकांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी पर्यटन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव यांनी या प्रस्तावाचे अत्यंत सकारात्मकता दाखवीत पुष्पाताई काळे यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत, सोयगाव परिसरातील गड-किल्ले, लेणी आणि निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांसाठी आवश्यक त्या मूलभूत पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारून दिल्या जातील, असे ठोस आश्वासन दिले.या बैठकीला संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित ट्रेकर्स, दुर्गप्रेमी आणि टूर ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुष्पाताई प्रकाश काळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सोयगाव पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार असून, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित सर्व टूर ऑपरेटर्सनी देखील या पर्यटन विकासाच्या कार्यात आणि नियोजनात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments