गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर येथे नेत्ररोग विभागात अत्याधुनिक AMT उपचारपद्धतीचा शुभारंभ



अहिल्यानगर : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर येथील नेत्ररोग (Ophthalmology) विभागामध्ये रुग्णांसाठी ॲम्निओटिक मेम्ब्रेन ट्रान्सप्लांट (Amniotic Membrane Transplant – AMT) ही अत्याधुनिक उपचारपद्धती सुरू करण्यात आली आहे. नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. अरुंधती पांडे यांनी पुढाकार घेऊन रुग्णांच्या हितासाठी हा उपक्रम यशस्वीपणे अंमलात आणला. या उपचारपद्धतीमुळे कॉर्नियावरील जखमा, अल्सर, रासायनिक भाजणे आणि नेत्रपटल तसेच इतर गंभीर नेत्रविकारांवरील उपचार अधिक प्रभावीपणे करता येणार असून रुग्णांना दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे.

ही अत्याधुनिक सेवा मा. डॉ. श्री. सुजय विखे पाटील व डॉ. अभिजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. तसेच ब्रिगेडियर डॉ. अरूण त्यागी सर, डॉ. देशपांडे सर, डॉ. सतीश मोरे सर आणि डॉ. प्रसाद काजळे सर यांच्या भक्कम पाठिंबा, मार्गदर्शन व सहकार्यामुळे ही सेवा यशस्वीपणे सुरू करणे शक्य झाले.

या उपक्रमासाठी प्रसूती व स्त्रीरोग (Obstetrics & Gynaecology) विभागाने मोलाचे सहकार्य केले. विशेषतः डॉ. उर्मिला गवळी व डॉ. सुहास शिंदे यांनी AMT साठी आवश्यक असलेल्या ॲम्निओटिक मेम्ब्रेनचे संकलन (Harvesting) करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

नेत्ररोग विभागाने सुरू केलेल्या या अत्याधुनिक उपचारपद्धतीमुळे अहिल्यानगर तसेच परिसरातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध होणार असून, हा आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments