शिर्डी येथे 22 ते 24 जुलै दरम्यान तीन दिवसीय मोफत आपत्ती व्यवस्थापन व कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन प्रशिक्षण कार्यक्रम!

शिर्डी (प्रतिनिधी)- श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या वतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ निमित्त ज्ञानदा फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने दि. २२ ते २४ जुलै २०२६ दरम्यान तीन दिवसीय मोफत आपत्ती व्यवस्थापन व कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दि. २२ व २३ जुलै रोजी दक्षता पथक, फायर विभाग, संरक्षण विभाग, MSF, BDDS व QRT या विभागांतील कर्मचाऱ्यांना चार सत्रांत प्रशिक्षण देण्यात आले. दि. २४ जुलै रोजी श्री साईनाथ व श्री साईबाबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी   गाडीलकर,यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीपकुमार भोसले तसेच फायर अधिकारी श्री प्रतापराव कोते उपस्थित होते. ज्ञानदा फाउंडेशन, पुणे येथील श्री विवेक नायडू, श्री लखन गायकवाड, श्री अक्षय चव्हाण व श्री जयेश अहिरे यांनी प्रशिक्षक म्हणून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापनाच्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्याची कार्यपद्धती, जखमी व्यक्तींना प्राथमिक उपचार, CPR, बचावकार्याची तंत्रे, एक व्यक्ती, दोन हात, तीन हात व चार हातांनी जखमी व्यक्ती उचलण्याच्या पद्धती तसेच स्ट्रेचरचा वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच चादर, ओढणी व बेल्ट यांच्या साहाय्याने जखमी अथवा अपघातग्रस्त व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या इम्प्रोव्हाइज्ड पद्धतींचे प्रात्यक्षिक करण्यात आले. साईभक्तांना फिट येणे, दातखिळ बसणे यांसारख्या प्रसंगी प्रभावी प्रथमोपचार कसे करावेत, गर्दीच्या कालावधीत आवश्यक दक्षता कशी घ्यावी, गर्दी व्यवस्थापनाची कार्यपद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमध्ये समन्वय कसा साधावा, याबाबतही प्रात्यक्षिक स्वरूपात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात संस्थानातील विविध विभागांतील सुमारे १,१८७ कर्मचारी सहभागी झाले. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्यात वाढ होऊन संभाव्य जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी आवश्यक असलेली तत्परता, आत्मविश्वास व कार्यक्षमता विकसित होण्यास मोठी मदत झाली.
ज्ञानदा फाउंडेशन, पुणे यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे निःशुल्क आयोजित केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी सर्व प्रशिक्षकांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी ज्ञानदा फाउंडेशन, पुणे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments