दिलीप शिंदे
सोयगाव दि.२२-- साने हॉस्पिटल व भारतीय जनता पार्टी, सोयगाव शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी दि.२२ मंगळवारी ग्रामीण रुग्णालय, सोयगाव येथील कोविड सेंटरमध्ये मोफत स्त्रीरोग व प्रसूती तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. मधुरी सानप (एमबीबीएस, डिजिओ) या महिलांची तपासणी करून तज्ज्ञ मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत.
महिलांच्या विविध आरोग्य समस्यांवर सखोल सल्ला देण्यासोबत आवश्यक तपासण्याही करण्यात येणार आहेत.शिबिरात मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भधारणेपूर्व व गर्भधारणेदरम्यान मार्गदर्शन, वंध्यत्व समस्या, पांढरा स्त्राव, गर्भाशयाच्या तक्रारी, रजोनिवृत्ती a संबंधित समस्या, गर्भवती महिलांची नियमित तपासणी, कुटुंब नियोजन सल्ला तसेच पीसीओएस, पीसीओडी तपासणी व मार्गदर्शन अशा विविध सेवांचा समावेश आहे. याशिवाय मोफत शुगर तपासणी, इसिजी तपासणी व औषधांचे वितरण करण्यात येणार आहे.या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या हस्ते होणार असून, सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी रोहित काळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांनी आपल्या जुन्या वैद्यकीय अहवालांसह उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या सुदृढतेचे आधारस्तंभ असून, वेळेवर निदान व उपचार हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. "सुदृढ महिला – सुदृढ कुटुंब” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साने हॉस्पिटल व भारतीय जनता पार्टी, सोयगाव शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments