धर्म, संस्कृती आणि समाजाच्या दृष्टीने सनातन बोर्डाची स्थापना ही समाजहितासाठी काळाची गरज – महंत आत्माराम गिरीजी महाराज



 शिर्डी ( प्रतिनिधी)- 
अलीकडेच राम मंदिरातील दानराशी चोरीच्या घटनेमुळे मंदिरांच्या व्यवस्थापनाबाबत आणि सनातन धर्माच्या संपत्तीच्या संरक्षणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील संत, महंत आणि धर्मप्रेमी नागरिकांकडून स्वतंत्र "सनातन बोर्ड" स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे.
सनातन बोर्डाची स्थापना झाल्यास मंदिरांची संपत्ती सुरक्षित राहील, दानराशीचा पारदर्शक वापर होईल आणि समाजकल्याणाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविता येतील. या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य, गोमातेच्या संरक्षणासाठी गोशाळांची उभारणी, तसेच आर्थिक अडचणीमुळे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देता येईल, असे मत श्री नर्मदेश्वर सेवा धामचे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले की,धर्म, संस्कृती आणि समाजहिताच्या दृष्टीने सनातन बोर्डाची स्थापना ही काळाची गरज असून केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
"समाजाच्या हितासाठी सनातन बोर्डाचे गठन व्हावे आणि सनातन धर्माच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे," असे आवाहनही त्यांच्याकडून यावेळी करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments