दिलीप शिंदे
सोयगाव दि.२९ - अनेक कुळांना कुल देवक वृक्ष आहेत. कळम आडनावाच्या कुळाचा कळम हा कुल देवक वृक्ष असल्याने सिल्लोड येथील वृक्ष संवर्धक व अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील यांनी निसर्ग संवर्धन हेतू हा वृक्ष भवन येथे कळम हे आडनाव तथा कुळ सर्वाधिक असल्याने त्यांच्याच हस्ते व मदतीने ग्राम पंचायतच्या आवारात लावला. पूर्ण गावाने याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे या कळमच्या ४ फूट रोपाने जमिनीत रोपण होण्याआधीच निसर्गात सृजनाच्या मदतीची भूमिका चोख निभावली आहे.
डॉ. पाटील यांच्या घरच्या रोप वाटिकेत अनेक रोपं ठेवलेली होती. त्यातील आत मध्ये मोठ्या पानाच्या कळम रोपावर गत महिन्यात ४० दिवसापूर्वी राखी वटवटी ( एशी प्रेणिया) या पक्षाने अंडी घालून वीण बनवली व ही चिमुकली पीलं उडून गेल्यावरच हे रोप लावण्यात आले. ----- कळम हा कदंब कुळातील वृक्ष असून याची पाने व फळे ही कदंबाहून लहान असतात. या दुर्मिळ वृक्षाची तालुक्यातील आमसरीच्या डोंगरात याची सहा ते सात मोठी झाडे आढळली आहेत.यांच्या बीजापासून पाटील यांनी गत वर्षी ५ रोपे बनवली असून ती विविध प्रकल्पात लावलीही आहेत.
--------------------------------------------------------------- जैवविविधतेत महत्त्वाची भूमिका - या वृक्षास ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फुल व संयुक्त फळ लगडते, ज्यास मंद आकर्षक सुगंध असून त्या कडे मकरंद व पराग सेवनास असंख्य मधमाशा, कीटक, फुलपाखरे आकर्षित होतात जे कृषी व्यवस्थेस व जंगलातील इतर वनस्पपतींच्या फलणास मदत करते. कमांडर जातीच्या फुलपाखराचा जीवनक्रम यावर पूर्ण होतो व ते विकसित होऊन भिरभिरते. गाव कावळा, डोम कावळा हे पक्षी या मोठ्या झाडावर घरटी करतात. कीर पोपट, पहाडी पोपट, तुईया हे पक्षी याची फळे खातात व बीज प्रसार करतात.
डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड.
0 Comments