लोणी :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अत्यंत प्रतिष्ठेचे 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान' राबविण्यात आले होते. या राज्यव्यापी मोहिमेमध्ये नाशिक विभागातून लोणी बसस्थानकाने आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापन, उत्तम प्रवासी सुविधा आणि उत्कृष्ट स्वच्छतेच्या जोरावर प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकावले आहे. या यशाबद्दल महामंडळाकडून लोणी बसस्थानकाला तब्बल ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि भव्य स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नाशिक येथे १ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला.
हा शानदार पुरस्कार सोहळा नाशिक प्रदेशचे माननीय व्यवस्थापक श्री. विजय गिते साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी नाशिकचे विभाग नियंत्रक श्री. क्षीरसागर साहेब आणि यंत्र अभियंता श्री. शेळके साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. लोणी बसस्थानकाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार आगार व्यवस्थापक श्री. प्रशांत गुंड साहेब आणि लोणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री. रावसाहेब पर्वत साहेब यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. संपूर्ण बसस्थानक परिसर स्वच्छतेने परिपूर्ण असा दिसतो आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यात लोणी आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले होते.
याच सोहळ्यात लोणी बसस्थानकासाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण पाहायला मिळाला. आपल्या कर्तव्यात सातत्य आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल लोणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री. रावसाहेब पर्वत यांना राज्य परिवहन महामंडळाचा विशेष 'लालपरी गौरवरत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिक प्रदेशचे मा. व्यवस्थापक श्री. विजय गिते साहेब यांच्या हस्ते श्री. रावसाहेब पर्वत यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. या दुहेरी मुकुटामुळे संपूर्ण लोणी परिसरात एसटी प्रशासनाचे नाव उंचावले आहे.
लोणी बसस्थानकाने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल आणि वाहतूक नियंत्रक श्री. रावसाहेब पर्वत यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. श्री. सुजयदादा विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील तसेच अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक श्री. राजेंद्र जगताप साहेब यांनी या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. यासोबतच लोणी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि लोणी बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थ यांनी वाहतूक नियंत्रक श्री रावसाहेब पर्वत साहेब व वाहतूक नियंत्रक श्री कानकाटे साहेब, आगार व्यवस्थापक श्री. प्रशांत गुंड साहेब या सर्वांचे अभिनंदन केले वाहतूक नियंत्रक श्री. रावसाहेब पर्वत साहेब यांच्यासह संपूर्ण बसस्थानक कुटुंबाचे मनापासून अभिनंदन केले आहे.
0 Comments