श्रीरामपूर प्रतिनिधी- अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील लोहार काम करणाऱ्या कुटुंबातील २७ वर्षीय अक्षय हरिभाऊ पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८१ वी रँक मिळवत 'आयएफएस केंद्रीय वन अधिकारी' पद मिळवून मोठे यश संपादन केले.
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या अक्षयने घरच्या पारंपरिक लोहार कामात आई-वडिलांना मदत करत शिक्षण पूर्ण केले. त्याचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, माध्यमिक शिक्षण श्री तिलोक जैन विद्यालयात झाले, तर पुणे येथे बी.टेक पूर्ण केल्यानंतर २०२२ पासून त्याने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यास करताना त्याला सलग तीन वर्षे अपयश आले, मात्र आई-वडिलांचे कष्ट आणि स्वतःची जिद्द डोळ्यासमोर ठेवून त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि दिल्लीतील एका संस्थेच्या मदतीमुळे त्याला हे यश मिळाले. त्याच्या यशाबद्दल विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला असून, लोहार समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे,ग्रामीण भागातील तरुणांसाठी अक्षय पवार प्रेरणास्थान ठरला आहे.
0 Comments