दिलीप शिंदे
सोयगाव दि.१२ -- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड व कन्नड तालुक्यात खरीप व रब्बी हंगामात युरिया, डीएपी तसेच इतर रासायनिक खतांची टंचाई निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून मागणी लावून धरली होती.
त्यांच्या प्रयत्नांना यश येत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी आर.सी.एफ. कंपनीकडे जळगाव येथील रेक पॉईंटवरून खत पुरवठा करण्याबाबत अधिकृत पत्र पाठविले आहे. पत्रानुसार एनएफएल , नर्मदा बायो केम तसेच आयपीएल कंपनीमार्फत येणाऱ्या खत रेकमधून सुमारे ३०० मेट्रिक टन खत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.पूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून खत पुरवठा होत असल्याने सोयगाव, सिल्लोड व कन्नड तालुक्यातील गावांपर्यंत खत पोहोचण्यास विलंब होत होता. त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागत होती. आता जळगाव येथून थेट पुरवठा झाल्यास युरिया, डीएपी व इतर रासायनिक खते वेळेवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.या कामासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती पुष्पा काळे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
0 Comments