राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्जाच्या झालेल्या छाननी प्रक्रियेत सात उमेदवारी अर्ज विविध कारणांवरून अवैध ठरविण्यात आले आहेत. २३ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले असून, यात आता भारतीय जनता पक्ष, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांसह वीस अपक्ष उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. या मतदार संघात आता अक्षय कर्डिलेंपुढे राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे सह वंचितचे संतोष चोळके यांचे कडवे आव्हान असणार आहे.
आज तहसीलदार कार्यालयात झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत उमेश महादेव मेहेत्रे, दत्तात्रय नारायण म्हसे, त्रिशला मिलिंद कांबळे, शिवाजी आनंदा कदम, नंदकुमार भागवत खेमनर, सोहम बापूसाहेब चिंधे, मोहम्मद शोएब सुभेदार शेख या सात उमेदवारांचे अर्ज आवश्यक प्रस्तावकांच्या सह्या नसणे, अनामत रक्कम नसणे, नामनिर्देशन पत्र परिपूर्ण नसणे या कारणांवरून अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमित पाटिल यांनी दिली.
छाननी नंतर आता भारतीय जनता पक्षाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गोविंद खंडू मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष एकनाथ चोळके या प्रमुख राजकीय पक्षांसह अथर्व साहेबराव म्हसे, अनिल भिकाजी जाधव, अल्ताफ इब्राहिम शेख, बाळू बाबूराव कोळसे, नागेश विलास जाधव, बाळासाहेब सोमा जाधव, इम्रान नबी देशमुख, संभाजी लक्ष्मण धोंडे, नामदेव बंडू पवार, प्रतिमा किशोर देसर्डा, प्रविण सुभाष दळवी, सखाहरी शांताराम बर्डे, बिलाल गफुर शेख, रविंद्र बापुसाहेब मोरे, रावसाहेब सदाराम खेवरे, सुदर्शन शांताबाई लक्ष्मण शितोळे, सविता रामचंद्र शेटे, साहेबराव पाटिलबा म्हसे, सुर्यभान दत्तात्रय लांबे, महेश केशव हापसे या उमेदवारांचे अपक्ष अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी उमेदवारी अर्जच दाखल केला नसल्याने भाजप च्या अक्षय कर्डिलेंना विधानसभेचा रस्ता मोकळा केल्याची चर्चा होत असतानाच ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्याने कर्डिलेंना मतदार संघात चांगलीच झुंज द्यावी लागणार आहे. बरोबरच वंचित बहुजन आघाडीकडून देवळाली प्रवरेचे नगरसेवक संतोष चोळके यांना एबी फाॅर्म दिला असल्याने या निवडणुकीची रंगत वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
0 Comments