राजुरी (वार्ताहर): महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा पाया रचणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणणारे महर्षी म्हणजे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होत. त्यांच्या अथक परिश्रमातूनच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला, ज्याने संपूर्ण देशासमोर विकासाचा एक नवीन प्रवरा पॅटर्न मांडला, असे प्रतिपादन आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत सारदे यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ) यांच्या वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील पद्मश्रींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील आणि विश्वस्त ध्रुव विखे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी कुलगुरू प्रो. डॉ. विष्णू मगरे, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे, डॉ. गणेश आहेर, डॉ. अमित मणी, सचिन गोर्डे, अमोल सरगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बीएससी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी ऋषीकेश मंडलिक व अथर्व सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. सोनाली म्हस्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या अभिवादन सभेला विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments