लोणी : - ( वार्ताहर )रूपाली भालेराव
राहाता तालुक्यातील लोणी आणि प्रवरा परिसरात निसर्गाचा मोठा लहरीपणा पाहायला मिळत आहे. भर उन्हाळ्यात सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक ढगांच्या कडकडाटासह आणि वेगवान वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. पुढील सलग चार तास पावसाचा जोर कायम राहिल्याने संपूर्ण परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. या अवेळी आलेल्या संकटामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली असून उन्हाळ्याच्या दिवसांत पावसाळ्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला असून बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. पावसासोबत सुटलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी वृक्ष उन्मळून पडली आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा थेट परिणाम पिकांवर झाला असून गहू, भाजीपाला, केळी आणि आंबा यांसारख्या फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला आहे. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून भविष्यातील चिंतेने त्यांना ग्रासले आहे.
पावसाचा जोर इतका भीषण होता की लोणी गावातील अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत असल्याने नागरिकांना या साचलेल्या पाण्यातूनच जीव मुठीत धरून वाट काढावी लागली. केवळ शेतीच नव्हे तर सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला असून लोणी परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विजेचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. भर उन्हाळ्यात आलेल्या या अवकाळी पावसामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय येत असून सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत या विद्यार्थ्यांना देखील अभ्यास करताना वीज नसल्या कारणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत त्यामुळे वीस पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.
0 Comments