नर्सिंग हा केवळ व्यवसाय नसून रुग्णसेवेचा वसा - डॉ. रवींद्र लावरे

विजय बोडखे 


राजुरी (वार्ताहर)  
नर्सिंग हा केवळ एक व्यवसाय नसून ते समर्पण आणि सर्वोत्तम रुग्णसेवेचा वसा आहे. इतर अनेक क्षेत्रे आज यंत्रवत झाली असली, तरी नर्सिंगला आजही मानवी चेहरा आहे. रुग्णांशी वागताना सहानुभूती, नैतिकता आणि प्रामाणिकपणा ही तीन सूत्रे अंगीकारणे नर्सिंग क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे यांनी केले.
सिंधूताई एकनाथराव विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमधील जीएनएम आणि बीएससी नर्सिंगच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा शपथविधी व दीपप्रज्वलन सोहळा उत्साहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी डॉ. बाळासाहेब विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतिश महाजन, प्राचार्य डॉ. राजेंद्र लामखेडे, नर्सिंग अधीक्षक संगिता विखे, स्मिता आहेर, उपप्राचार्य हिरा जयशीला आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. लावरे पुढे म्हणाले की, रुग्णांशी आत्मीयतेने वागल्यास त्यांना आजारातून सावरण्यासाठी मोठी उभारी मिळते. रुग्णांना परिचारिकांचा आधार आणि विश्वास वाटेल, अशी सकारात्मक भूमिका ठेवणे काळाची गरज आहे.
या कार्यक्रमात नर्सिंग अधीक्षक संगिता विखे यांनी सर्व विद्यार्थ्यांना नर्सिंग व्यवसायाची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र लामखेडे यांनी केले, तर सूत्रसंचालन रवींद्र विखे व सोनाली म्हस्के यांनी केले. शेवटी स्वप्नील तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments