साहित्यिकांनी प्रतिभेचा वापर समाजासाठी करावा – कॉ.सुरेश पानसरेशब्दगंधची राहाता तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर




(लोणी प्रवरा प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे)
साहित्यिकांनी गटतटाचे राजकारण वगळून साहित्याशी प्रामाणिक राहून कार्यरत राहावे, सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर लेखन करावे आणि आपल्या प्रतिभेचा वापर समाजहितासाठी करावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.सुरेश पानसरे यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राहाता तालुका शाखा कार्यकारी मंडळाच्या निवड प्रसंगी लोणी येथील संकल्प मंगल कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सोपानराव विखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, नियोजन समिती प्रमुख बबनराव गिरी व शर्मिला गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत राहाता, शिर्डी व लोणी परिसरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत राहाता तालुका शाखेच्या अध्यक्षपदी साहेबराव तुपे, सचिवपदी सुमेध ब्राह्मणे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. संदीप तपासे, उपाध्यक्षपदी सुयश वाघमारे, खजिनदारपदी विजय तांबे यांची निवड झाली. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सोपानराव विखे, भास्कर दादा लगड, संतोष ब्राह्मणे, भास्करराव निर्मळ तसेच सुरेश पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी साहेबराव तुपे यांनी नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच शिर्डी येथे तालुकास्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
प्रा. सोपानराव विखे म्हणाले की, कोणत्याही सोयी-सुविधा नसताना शब्दगंधने गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. या कार्यातून अनेक नवोदित लेखक घडले असून ही चळवळ विस्तारत असल्याचे पाहून समाधान वाटते.
शब्दगंधच्या विविध उपक्रमांची माहिती सुनील गोसावी यांनी दिली, तर सुमेध ब्राह्मणे यांनी आभार प्रदर्शन केले.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, कार्यवाह भारत गाडेकर ,खजिनदार भगवान राऊत व मुंबई जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ.रमेश वाघमारे यांनी विशेष अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments