बालसंगोपन विलंबप्रकरणी दोषींवर कारवाई करासाळवे यांची मुख्यमंत्र्यांसह आयुक्तांकडे मागणी




टाकळीभान(प्रतिनिधी)-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा दोन वर्षांपासून थकीत असलेला निधी तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. तसेच निधी उपलब्ध असूनही निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास विलंब करणाऱ्या दोंषींवर कारवाई करावी, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे केली आहे. पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयात सहायक आयुक्त
योगेश जवादे यांना निवेदन देऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. अनाथ मुला-मुलींच्या शिक्षण व संगोपनासाठी या योजनेंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत थेट डीबीटीद्वारे दरमहा २२५० रुपये व कोविड मध्ये पालक गमावलेल्या बालकांना केंद्र सरकारच्या पीएम केअर फंड फॉर चिल्डरन्स या प्रायोजकत्व योजनेंतर्गत दरमहा ४ हजार रुपये लाभ दिला जातो. राज्यात दोन्ही प्रकारचा लाभ घेणारे योजनेचे दीड लाख लाभार्थी आहेत. याशिवाय राज्यभरातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालये तसेच जिल्हा बालकल्याण समितीकडे सादर केलेले हजारो अर्ज प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत. दीड ते दोन वर्षांपासून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
   आयुक्तालयास विधिमंडळाच्या डिसेंबर २०२५ च्या हिवाळी व फेब्रुवारी २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्येकी १०० कोटींची पुरवणी मागणी करण्यात आली. दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विभागाने बालसंगोपन योजनेसाठी ६० कोटी रुपये वितरित केले. पण निधी असूनही गेल्या दीड ते दोनवर्षांपासून लाभार्थी लाभापासून वंचित असल्याने त्यांचे शिक्षण, संगोपनासाठी व एकल महिलांचे संसार चालविताना हाल होत आहेत.
     अनुदानाबाबत विधिमंडळ अधिवेशनात आ. हेमंत ओगले, प्रशांत ठाकूर, अतुल भातखळकर, स्नेहा दुबे-पंडित, अमोल जावळे, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, सदाशिव खोत आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केले. त्यावर विभागास प्राप्त निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आल्याचे लेखी उत्तर देण्यात आले. मात्र अद्यापही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही.

Post a Comment

0 Comments