शिर्डी (राजकुमार गडकरी)--
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद जवळील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भद्रा मारुती संस्थान येथे श्री हनुमान जयंती निमित्त सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पारायणासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीरामनवमी, गुरुवार दि. २६ पासून प्रारंभ झालेल्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम होत असून त्यात विशेष आकर्षण ठरत आहे ते म्हणजे संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाचे पारायण होय. हे ज्ञानेश्वरी पारायण प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मधुर वाणीतील वाचनातून सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यंत भक्तिभावाने पार पडत आहे.
या पारायणासाठी लहान मुले, मुली, युवक, महिला तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीची तन्मयता दिसून येत आहे. ज्ञानेश्वरीतील गूढ तत्त्वज्ञान आणि जीवनमार्गदर्शक विचार ऐकण्यासाठी भाविक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
संत ज्ञानेश्वरांनी समाजप्रबोधन आणि मानवकल्याणासाठी लिहिलेला हा बहुमोलाचा ग्रंथ आजही प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरत आहे. “जीवनात एकदा तरी ज्ञानेश्वरीचे पारायण करावे,” असा संदेश देत हभप संजयजी महाराज जगताप( भऊरकर) यांनी अनेकांना प्रेरित केले असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे मोठ्या संख्येने भाविक पारायणात सहभागी होत आहेत.
या भक्तिमय सोहळ्यावेळी श्री क्षेत्र भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, उपाध्यक्ष बाबासाहेब बारगळ, कचरू पाटील बारगळ ,विलास अवचट, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.
0 Comments