टाकळीभान प्रतिनिधी:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर तसेच कै. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहिल्यानगर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उमेदवारांची जागेवरच निवड केली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून रोजगाराच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. ही नामांकित कंपनी सहभागी होणार असून, उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांना “कमवा व शिका” या स्वरूपाची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांचे वय १८ ते २९ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, किमान दहावी/बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. या छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना बंगळुरू (कर्नाटक) येथे दोन वर्षे मानधनासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा आणि संबंधित ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखत द्यावी. अधिकाधिक उमेदवारांनी www.ncs.gov.in या संकेतस्थळावरही नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह समन्वयक श्री. वसीमखान पठाण (मो. ९४०९५५५४६५) यांच्याशी संपर्क साधावा.
0 Comments