(लोणी /प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे) हनुमंतगांव : एकलव्य आदिवासी सेना महाराष्ट्र राज्य, एकलव्य मित्रमंडळ हनुमंतगाव तसेच हनुमंतगाव पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी योद्धा, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी शौर्यवीर गुरुवर्य भगवान एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुवर्य भगवान एकलव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक घोलप यांनी शौर्यवीर भगवान एकलव्य यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाने एकलव्यांचे गुण आत्मसात करून त्यांनी जशी धनुर्विद्या चिकाटीने आत्मसात केली,
त्याचप्रमाणे आजच्या पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण हाच खरा परिवर्तनाचा मार्ग असून आदिवासी मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन समाजात नावलौकिक मिळवावा, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
एकलव्य आदिवासी सेना महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली समाजजागृतीची चळवळ ही आदिवासी समाजासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मत संजय अनाप यांनी व्यक्त केले. या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन, मार्गदर्शन व संघटनात्मक बळ देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे यांनी आपल्या भाषणात शबरी मातेसारख्या अखंड भक्तीचे उदाहरण देत गुरू-शिष्य नात्याची परंपरा अधोरेखित केली. भगवान एकलव्य यांच्या निष्ठेमुळे महाभारत पवित्र झाले, असे सांगत त्यांनी आदिवासी समाजाने ज्ञानार्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. शासनाकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न होत असून आज आदिवासी समाजातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण घेत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणाच्या बळावर समाजातील मुले-मुली उच्च शिक्षणाने विभूषित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्लोबल कहार चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया यांच्या वतीने कामिनीताई तुंबारे व अरविंद तुंबारे तसेच मोहटा देवी युवा प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानेश्वर आहिरे साहेब यांचा सत्कार करण्यात आला. एकलव्य मित्रमंडळ तसेच हनुमंतगाव ग्रामस्थांच्या वतीने भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेची उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात व घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमास एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक घोलप, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य कैलास माळी, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव, राहता तालुका अध्यक्ष अनिल रोकडे, राहता तालुका कार्याध्यक्ष कैलास बर्डे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुदामराव मोरे, राहुरी तालुका अध्यक्ष राजू निकम, युवा तालुका अध्यक्ष सनी अहिरे, डॉ. अरविंद तुंबारे, संजय अनाप सर, गोरक्षनाथ ब्राह्मणे, शब्बीर शेख, कामिनी डिंबर, बबलू अनाप, नितीन पिंपळे, राजेंद्र पिंपळे, बाबासाहेब डांगे, सचिन पवार, सुभाष ब्राह्मणे, आकाश पलघडमल, नवगिरे सर, अविनाश तुंबारे, रवींद्र पर्वत, वसंत घोलप, वाल्मीक पगारे, अरुण शिंदे, परसराम मांढरे, अरुण प्रधान, ज्ञानेश्वर अनाप, प्रसाद ब्राह्मणे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन नवगिरे सर यांनी केले व पोपटराव पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
एकलव्य जयंती निमित्त हनुमंतगावात संघटन, शिक्षण आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संघटन आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
0 Comments