ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या जखमी तरुणास पोलिसांनी ठाण्यातच मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप!, ग्रामस्थांसह महिलांचा ठाण्यात ठिय्या --




दिलीप शिंदे 
सोयगाव दि. २१-- मारहाणीत जखमी झालेला तरुण सोयगाव पोलिस ठाण्यात दि.१९ गुरुवारी तक्रार देण्यासाठी गेला असता जखमी तरुणास पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीतच मारहाण केल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे. या मारहाणीत जखमी तरुणाची तब्ब्येत खालावल्याने उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

झालेल्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरासह परिसरात पसरल्याने जखमी तरुणाला पोलिसांनी का मारले याचा जाब विचारण्यासाठी काळे नगर येथील महिलांसह ग्रामस्थानी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.यावेळी काही काळ ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जखमी तरुणाच्या तक्रारीवरून गुरुवारी रात्री उशिरा अकरा जणांवर सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
        याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील काळेनगर येथील रहिवासी असलेला शैलेश शंकर जोहरे वय २५ वर्षे असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दि.१९ गुरुवारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास शैलेश जोहरे हा मित्र सागर इंगळे, परमेश्वर राऊत व गणेश कोळी रा. काळेनगर सोयगाव यांच्यासोबत शिवजयंती साठी डेकोरेशन आणण्यासाठी शेंदुर्णी कडे जातेवेली भैरवबा मंदिराच्या पुढे असतांना सोयगाव येथील तरुणांनी मोटारसायकल अडवून म्हणाले तुम्ही रात्री शिवजयंती मध्ये किरकोळ भांडणात होते.तेंव्हा मी त्या भांडणामध्ये नव्हतो असे समजावून सांगत असतांना रितेश काळे याने माझ्या डोक्यात रॉड टाकला व आदित्य काळे याने माझ्या डाव्या हाताच्या कोपरावर रॉड मारला. व इतर लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मला व माझ्या सोबत असलेल्या सागर, परमेश्वर व गणेश यांना सर्व लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून आम्हाला म्हणाले तुम्ही आमच्या नांदी लागले तर तुम्हाला जिवंत मारून टाकू अशी धमकी दिली.तेंव्हा मला गोपाल बारी व सोनू कोळी यांनी त्यांच्या तावडीतून सोडवून सरकारी दवाखान्यात आणले व माझ्या सोबतचे तीन मित्र त्यांच्या तावडीतून पळून गेले असल्याचे शैलेश शंकर जोहरे यांनी सोयगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रितेश दिनेश काळे,श्रीराम गणेश काळे,तेजस रवी काळे,आदित्य रवी काळे,शुभम संजय गाडेकर,जयेश संजय गाडेकर,पवन सुकलाल परदेशी,दीपक सुकलाल परदेशी, आदित्य समाधान काळे,हर्षल कैलास काळे, स्वप्नील चौधरी सर्व रा.सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर, या अकरा जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(२), ११५(२), १२६(२), १८९(२), १९०, १९१(२), ३५२, ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल,उपनिरीक्षक गजानन आरेकर,अजय कोळी, गजानन दांडगे,समाधान बारी आदी पुढील तपास करीत आहे.

चौकट:- जबर जखमी असलेल्या शैलेश जोहरे याने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जखमी तरुण हा सोयगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला असता पोलिसांनी जखमी तरुणाची हालत न बघता त्याला ठाण्यात मारहाण केल्याचा गंभीर आरोप जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काळेनगर वासियांकडून केली जात आहे.

चौकट:- सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सोयगाव पोलिसांचे वाभाडे काढले आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोयगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधधंद्यानी कळस गाठला आहे.अनेक सामाजिक कार्यकते, पक्षाचे कार्यकर्ते यांनी पोलिस अधीक्षक विनय कुमार राठोड यांना निवेदन देऊन देखील अवैध धंदे बंद झाले नाही.तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी मनिषा मेने-जोगदंड यांनी देखील अवैधधंदे विषयी सोयगाव पोलिस यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.तरी देखील अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे. अवैध धंद्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवैधधंदे बंद करण्यात सोयगाव पोलिस सक्षम नाहीत का? जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
(दिलीप शिंदे सोयगाव तालुका प्रतिनिधी यांच्या सहकार्याने बातमी नेटवर्क वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.)

Post a Comment

0 Comments