साऊ'चा मंत्री विखेंकडून गौरव

टाकळीभान प्रतिनिधी


-जिल्ह्यासह राज्यभरात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांच्यासह समितीला पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा कृषी व पशुसंवर्धन विभाग, आत्मा तसेच एक्स्पो इंडियन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव

'कृषी पर्व' चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या पुढाकारातून जिल्हास्तरीय स्वयंसहायता बचतगट समुहांच्या उत्पादन व विक्रीचे साईसरस प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्धघाटन सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते साऊ एकल समितीस गौरविण्यात आले.

समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे, जिल्हा समन्वयक अशोक कुटे, तालुका समन्वयक प्रतिमा कुलकर्णी (अकोले), प्रकाश इथापे (नगर) उज्ज्वला शेळके

(जामखेड), जयश्री कुटे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र स्वीकारले. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने हे प्रशस्तीपत्र दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून राज्यभरात एकल महिला सक्षमीकरणासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, स्वामी विज्ञानानंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उमेदचे व्यवस्थापक सोमनाथ जगताप उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments