दिलीप शिंदे
सोयगाव दि. ०९-- सोयगाव तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आमखेडा गटातील निंबायती गणात शिवसेनेच्या (शिंदे गट) सविता सोपानराव गव्हांडे या विजयी झाल्याने घोसला गावात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत विजयी मिरवणूक काढली.
दरम्यान भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बद्री हजारी राठोड यांच्या परिवाराने निंबायती गणाचे गेल्या पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्व केलेले होते. भाजपने निंबायती गणातून पुन्हा त्यांना मैदानात उतरवले होते. तर त्यांच्या विरोधात घोसला येथील मराठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सोपानराव गव्हांडे यांच्या पत्नी सविता सोपानराव गव्हांडे यांना शिवसेनेने (शिंदे गट) मैदानात उतरवले होते. सविता सोपानराव गव्हांडे यांना ५११० तर भाजपाचे बद्री हजारी राठोड यांना ३६२२ मतदान पडले यात सविता सोपानराव गव्हांडे या १४८८ मतांनी निंबायती गणातून विजयी झाल्या. भाजपाचा अभेद्य गड असलेल्या निंबायती गणात शिवसेनेचा भगवा फडकावला. सविता गव्हांडे यांच्या विजयात पती सोपानराव गव्हांडे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर (आबासाहेब) काळे,मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे, तालुकाध्यक्ष विजय चौधरी,गणेश माळी आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. विजयी उमेदवार सविता सोपानराव गव्हांडे यांचे गावात जल्लोषात स्वागत करीत औक्षण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली होती. सविता गव्हांडे यांनी मतदारांसह कार्यकर्त्यांचे आभार मानले.
0 Comments