बास्केटबॉल मैदानावर प्रवराच्या खेळाडूंचा ‘विखे पॅटर्न’; जळगावमधील स्पर्धेत मुलींच्या संघाने कोरले विजेतेपदावर नाव!

विजय बोडखे 

राजुरी (वार्ताहर):जळगाव येथील गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आयोजित 'बास्केटबॉल लीग' स्पर्धेत प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (अभिमत विद्यापीठ) डॉ. बाळासाहेब विख पाटील मेडिकल कॉलेजच्या संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे. या स्पर्धेत प्रवराच्या मुलींच्या संघाने सलग तीन विजयांची नोंद करत प्रथम क्रमांकाचे भव्य पारितोषिक पटकावले, अशी माहिती क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार यांनी दिली.

            मैदानावर प्रवराची हुकूमत दाखवत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत प्रवराच्या मुलींनी लातूर मेडिकल कॉलेज, सोलापूर मेडिकल कॉलेज आणि यजमान डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज (जळगाव) यांच्या संघांना पराभवाची धूळ चारली. उत्कृष्ट समन्वय आणि चपळाईच्या जोरावर मुलींच्या संघाने अजिंक्यपद आपल्या नावावर केले.

            या स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीतही प्रवराच्या खेळाडूंनी चमक दाखवली. मुलींच्या संघातून यशश्री कर्डिले हिने अष्टपैलू खेळ करत 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब पटकावला. तसेच मुलांच्या गटात यश मोडक याने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर 'मॅन ऑफ द मॅच' हा बहुमान मिळवला.

मार्गदर्शन आणि कौतुक:

            या यशामागे क्रीडा संचालक डॉ.सुनील बुलार आणि क्रीडा शिक्षक नितीन गोर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या देदिप्यमान यशाबद्दल प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील आणि विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही.एन.मगरे यांनी विजेत्या खेळाडूंचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments