टाकळीभान प्रतिनिधी- याबाबत अधिक माहिती अशी की,एका महिलेने गोड गोड बोलून शिक्षकाची सर्व माहिती काढून घेतली आणि त्याच्याशी सतत मोबाईवर संपर्कात राहत नंतर तुझ्यावर बलात्काराचा/रेपचा खोटा गुन्हा दाखल करील असे म्हणत व १० लाखांची मागणी करत त्याच्याकडून आत्तापर्यंत ३ लाख लुटण्याचा प्रकार श्रीरामपुरातील एका क्रिडा शिक्षकाच्या बाबतीत घडला आहे. याबाबत शिक्षकाच्या फिर्यादीवरून सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेश लहू कोल्हे, रा.उत्सव मंगल कार्यालय रोड, वॉर्ड नं.७, श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण क्रिडा शिक्षक असून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी येणाऱ्या मुलांना श्रीरामपुरातील आदर्श लॉज येथे थांबवत असतो. सप्टेंबर २०२४ मध्ये क्रिडा स्पर्धेकरीता आलेल्या विद्यार्थ्यांना आपण या लॉजवर थांबवले होते. तेथे मला जमुना (नाव बदलले आहे) ही महिला भेटली. वडाळामहादेव, ता. श्रीरामपूर येथे ती राहत असल्याचे तिने सांगत आपला मोबाईल नंबर घेवून आपल्याशी मैत्री केली व गोड गोड बोलून आपली नोकरी, कौटुंबिक तसेच आर्थिक स्थितीबाबत माहिती काढून घेतली. सदर महिलेशी आपण फोनवर बोलायचो मात्र तिला कधीही एकांतात भेटलो नाही. ऑक्टोबर २०२५ पासून अचानक सदर महिला आपल्याला १० लाख रूपयांची मागणी करू लागली. तेव्हा आपला काही व्यवहार नाही अथवा घेणे-देणे नाही, मी पैसे का देऊ? असे म्हटल्याने त्याचा राग येवून तू जर मला पैसे दिले नाही तर मी तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून मी तुला जेलमध्ये बसवेन, तुझ्या परिवाराची बदनामी करेल, अशाप्रकार धमकावले.
दरम्यान शिक्षकी पेशा व समाजातील बदनामीच्या भितीने आपण घरातील सोने गहाण ठेवून या महिलेस २ लाख रूपये रोख स्वरूपात दिले. तेव्हा सदर महिला काही करणार नाही असे वाटले. परंतु नोव्हेंबर २०२५ मध्ये रात्री आपल्या घराजवळ येवून आरडाओरडा करून सदर महिलेने दगडफेक केली, वडीलांना दम दिला. तेव्हा आपल्या वडीलांनी शहर पोलिसात तक्रार दिल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा या महिलेने घरी जाऊन गोंधळ घातला. तेव्हा पुन्हा घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली. पुन्हा या महिलेने गोंधळ करू नये म्हणून तिला आपण ०१ लाख रूपये दिले. सदर प्रकारामुळे आपण गोंधळलेलो असताना आपल्याला समजले की सदर महिलेने यापूर्वी पुणतांबा येथे राहणाऱ्या इसमाशी अशीच ओळख करून त्याच्याविरोधात श्रीरामपूर कोर्टामध्ये बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंतर या महिलेने तडजोड करून केस मागे घेतली. त्यामुळे आपल्याही विरोधात ही महिला खोटा गुन्हा दाखल करेल, अशी भिती वाटल्याने आपण पोलिसात सदर महिलेने १० लाखांची खंडणीची मागणी करून पैकी ३ लाख रूपये रोख घेतले व दर महिन्याला ५ हजार रूपये खंडणी स्वरूपात देण्याची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर बलात्काराच्या खोटया गुन्हयात अडकवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments