राजुरी (वार्ताहर): प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित 'तीळगुळ आणि हळदी-कुंकू' समारंभ लोणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महिला कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे सहावे यशस्वी वर्ष होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर सुवर्णा जोंधळे, उज्ज्वला कवडे, शुभा महाजन, स्वरूपा गावडे, डॉ. शुभांगी म्हस्के-मणी, अलका जगदाळे यांच्यासह मान्यवर महिला उपस्थित होत्या.
सांस्कृतिक वैभव आणि कलाविष्कार कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट अशा समूह नृत्यांनी व गायनाने उपस्थितांची मने जिंकली. या व्यासपीठाच्या माध्यमातून केवळ आरोग्य सेवाच नव्हे, तर कलेच्या क्षेत्रातही प्रवरातील महिला अग्रेसर असल्याचे दिसून आले.
यंदाच्या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेतील ड्रेक विद्यापीठाच्या सहा आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनींची उपस्थिती. डॉ. रॅचेल मॅकहग यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या या विद्यार्थिनींनी पारंपरिक भारतीय पद्धतीचा हा सोहळा मोठ्या कुतूहलाने आणि आनंदाने अनुभवला. भारतीय संस्कृतीतील 'वाण' वाटप आणि हळदी-कुंकवाच्या परंपरेने या परदेशी पाहुण्यांना भारावून टाकले होते.
विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील म्हणाल्या की, "प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि विद्यापीठातील सर्व स्तरांतील महिला कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधता यावा, या सोहळ्यामुळे आम्हाला एकमेकांच्या जवळ येता येते. कामाच्या व्यापातून वेळ काढून महिलांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करता यावे, यासाठी हे व्यासपीठ आम्ही कायम उपलब्ध करून देऊ."
0 Comments