टाकळीभान प्रतिनिधी -अहिल्यानगर जिल्ह्यातील एकल महिलांना जास्तीत जास्त रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा एकल महिला सक्षमीकरण समिती व जिल्हा मिशन वात्सल्य शासकीय समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या. समितीचे सदस्य सचिव तथा तथा उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी प्रारंभी मागील दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचन करून आढावा सादर केला. समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री विनायक देशमुख, साऊ एकल महिला समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, प्रकाश इथापे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा प्रकल्प अधिकारी संजय कदम यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
एकल महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची विक्री होण्यासाठी तालुका पातळीवरील तसेच इतर मोठ्या मॉल, विक्री दालनांशी संपर्क साधून ७ दिवसात आढावा बैठक घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस अहिल्यानगर जिल्ह्यात वेग आला आहे. त्यामुळे एकल महिलांना अल्पकालिन विद्युतविषयक प्रशिक्षण देतानाच सौर ऊर्जा उपकरण दुरूस्तीचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करावेत, असेही त्यांनी सांगितले. त्यावर असे अभ्यासक्रम आखल्याचे प्रथम संस्थेचे दिवाकर भोयर यांनी सांगितले. २६ जानेवारीपूर्वी ३०० महिलांना स्वयंरोजगार देण्याचे उदिष्ट पूर्ण करण्याची सूचना विनायक देशमुख यांनी केली. नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण संथगतीने सुरू असल्याने त्यास गती देऊन फक्त अंगणवाडीच्या परिसरापुरते सर्वेक्षण न करता शहरी भागातील घरोघर सर्वेक्षण होईल, असे नियोजन करण्याची सूचना मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, प्रकाश इथापे यांनी केली. त्यानुसार हे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
आरोग्य सेवा क्षेत्रासोबतच माती परीक्षण प्रयोगशाळांशी निगडित रोजगार एकल महिलांना उपलब्ध करून देण्याबाबत विचार व्हावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. एकल महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक दायित्व निधी मिळेल. त्यासाठी चांगले प्रस्ताव अधिकारी व स्वयंसेवी संस्थांनी सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
*"मिशन वात्सल्य समिती "बैठका नियमित व्हाव्यात*
एकल महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी तालुका स्तरावर मिशन वात्सल्य शासकीय समित्यांची स्थापना केलेली आहे. तहसीलदार या समितीचे अध्यक्ष आहेत. ते जर या बैठका घेत नसतील तर बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांनी यासाठी तहसीलदारांकडे पाठपुरावा करावा. कोणत्याही परिस्थितीत या बैठका नियमित झाल्या पाहिजेत, अशी तंबी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
0 Comments