दिलीप शिंदे
सोयगाव दि.१५- सोयगाव- फर्दापूर रस्त्यावरील दिगंबर जैन मंदिराजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत वनप्राणी रोही (मादी) चा तडफडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी सहा ,साडे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. वनमजूर राजू झोंड हे घटनास्थळी सकाळी सात वाजे पासून हजर होते.
अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिल्यानंतर वनरक्षक तब्बल पाच ते सहा तासानंतर घटनास्थळी आल्याने वन्य प्राणी प्रेमींमधून अजिंठा वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत रोहीचा मृत्यू, सहा तास रस्त्याच्या कडेला पडून, अजिंठा वनविभागाचा हलगर्जीपणा --
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव - फर्दापूर रस्त्यावर असलेल्या दिगंबर जैन मंदिराजवळ दि.१५ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वन्यप्राणी रोही मादीचा (वय तीन वर्षे) रस्त्याच्या कडेला तडफडून मृत्यू झाला. प्रथमदर्शनी यांनी वनमजूर यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली असता राजू झोंड हे वनमजूर सकाळी सात वाजता घटनास्थळी दाखल झाले.मात्र अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या फर्दापूर बीटच्या वनरक्षक, वनपाल हे घटनास्थळी तात्काळ पोहचले नाही. वनरक्षक तब्बल चार ते पाच तासानंतर घटनास्थळी दाखल झाले. फर्दापूर ते घटनास्थळ अंतर हे तीन ते चार किलोमीटर असून वनरक्षक यांना घटनास्थळी पोहचण्यास इतका वेळ का लागला असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. वनरक्षक स्थानिक ठिकाणी राहत नसल्याने वन्यप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान वनमजूर राजू झोंड व रोजंदारी ने काम करणारा सय्यद समदानी हे घटनास्थळी ठाण मांडून होते. रोही तब्बल सहा तास रस्त्याच्या कडेला पडून होता. सहा तासानंतर हालचाली सुरू झाल्या. सोयगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. दानिश बुखारी यांनी दुपारी दोन वाजेचा सुमारास मृत रोही चे शवविच्छेदन केले.रस्त्याच्या कडेला रोहीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोण कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments