दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९ - सोयगाव तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या दहा वरखेडी बू येथे लाखो रुपये खर्च करून आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, आयुष्मान भारत ही इमारत बांधण्यात आली असून उपकेंद्राच्या ठिकाणी कुणीही राहत नसल्याने गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुष्मान भारत ची इमारत ओसाड पडली असून इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडलेल्या असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली या बाबत ची माहिती घेण्यासाठी सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने डॉ. गीतेश चावडा यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या वरखेडी बू येथे लाखो रुपये खर्च करून आरोग्य वर्धिनी उपकेंद्र आयुष्मान भारत ची मोठी इमारत बांधण्यात आली.या ठिकाणी आरोग्य विभागाचा कर्मचारी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे. उपकेंद्राच्या ठिकाणी आरोग्य विभागाचा कर्मचारी राहत नसल्याने या इमारतीच्या परिसरात मोठे घाणीचे साम्राज्य पसरले असून परिसराचा शौच्यासाठी उपयोग केला जात आहे. इमारतीत असलेले लाखो रुपयांचे साहित्य दुळखात पडून आहे.इमारतीच्या खिडकीच्या काचा फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शासकीय इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्या प्रकरणी सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी काय कारवाई केली याची माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर काय कारवाई झाली हे मात्र निरुत्तरित आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिला नसल्याने आरोग्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी याप्रकरणी लक्ष घालून शासकीय मालमत्ता नुकसानी पोटी गुन्हे दाखल करण्यात यावा व कर्तव्यात कसूर करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गीतेश चावडा यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments