दिलीप शिंदे
सोयगाव दि.१५ -- सोयगाव पोलीस निरीक्षकांना शहरासह परिसरात सुरू असलेले अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करण्याविषयी दि.०४ डिसेंबर रोजी सोयगाव तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मनिषा मेने-जोगदंड यांनी पत्र दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांविषयी तालुका दंडाधिकारी यांना हस्तक्षेप करावा लागत असल्याने पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर जनतेकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुका दंडाधिकारी यांनी पत्र देऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला असून अवैध धंद्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, भाजपाचे माजी पदाधिकारी समाधान सूर्यवंशी यांनी सोयगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैधधंदे,चोरटी गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची लेखी तक्रार थेट मंत्रालय गाठत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली होती. याचा राग मनात धरून अवैध धंदे वाईकाने समाधान सूर्यवंशी यांना जीव मारण्याची धमकी दिली होती याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान रिपब्लिक सेनेचे सोयगाव तालुकाध्यक्ष अंकुश पगारे यांनी शहरासह परिसरात सुरू असलेले अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करण्यात यावे अशी दि.०२ डिसेंबर रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अवैध धंदे तर बंद झालेच नाही. मात्र अंकुश पगारे यांना अवैध धंदेवाईकाकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. अवैध धंदे बंद करण्यासाठी आवाज उठविणाऱ्यांनाच जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे समोर आले आहे. सोयगाव तालुक्यातील सोयगाव व फर्दापूर पोलिस ठाण्याचे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी सोयगाव भाजपाचे माजी पदाधिकारी समाधान सूर्यवंशी यांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.तर रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अंकुश पगारे यांनी देखील निवेदन दिले. अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करण्यात यावे व अंकुश पगारे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना पायबंद करावे असे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मनिषा मेने-जोगदंड यांनी सोयगाव पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तहसीलदार यांना सुरू असलेल्या अवैध धंद्या बाबत हस्तक्षेप करावा लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सर्व सामान्य जनतेकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरी देखील अद्यापही पोलिसांकडून अवैध धंद्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.यामुळे अवैध धंदेवाईकांना कोणाचे वरदहस्त आहे याविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोयगाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करणे हे ग्रामीण पोलिस अधीक्षकांपुढे मोठे आवाहन असल्याची चर्चा जनतेत रंगली आहे. समाधान सुर्यवंशी व अंकुश पगारे यांच्या लढ्याला किती यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments