नेवासा (प्रतिनिधी)
नेवासा पोलीस ठाण्यासमोर आदिवासी बचाव समितीचे उपोषण सुरू
जो पर्यंत अपहरण झालेल्या आमच्या अल्पवयीन मुलीचा शोध पोलीस घेत नाहीत व आरोपीवर कायदेशीर कारवाई करीत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका अपहरण झालेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीच्या आई-वडिलांनी घेऊन नेवासा पोलीस स्टेशन समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक सदस्य शिवाजीराव गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंब नेवासा तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांच्यासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहे.
यावेळी उपोषणाचे नेतृत्व करणारे शिवाजीराव गांगुर्डे म्हणाले की, नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील आदिवासी भिल्ल समाजातील अल्पवयीन मुलगी मयुरी गणेश गायकवाड हिचे 17 नोव्हेंबर रोजी नेवासा फाटा आयटीआय कॉलेज पासून अपहरण झाले. एक डिसेंबर रोजी मुलीचे आई-वडील यांनी नेवासा पोलीस स्टेशन मध्ये येऊन रीतसर फिर्यादी दिली. त्यामध्ये आरोपीच्या नावाचा व ज्यांनी आरोपीला अपहरण करण्यास सहकार्य केले आशा सर्वांचे नावे पोलिसांना पत्त्यानिशी सांगितली परंतु पोलिसांनी 29 दिवस झाले तरी अद्यापही मुलीचा शोध लावलेला नाही तसेच मुलगी अल्पवयीन असतानाही पोलिसांनी आरोपींवर जाणीवपूर्वक पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही. याचा अर्थ या प्रकरणात पोलीसच आरोपीला पाठीशी घालत आहेत हे सिद्ध झाले आहे. एवढा मोठा गंभीर गुन्हा घडला असतानाही पोलीस का कारवाई करत नाहीत ? असा साधा आणि सरळ प्रश्न उपोषणकर्त्यांनी विचारला आहे. मुलीच्या आई-वडिलांनी वेळोवेळी पोलीस स्टेशनशी संपर्क करून किंवा चकरा मारून मुलीची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांकडून कोणतेही सहकार्य झालेले नाही. परिणामी अपहरण झालेल्या मुलीचे आई-वडील यांच्यावर आज उपोषणास बसण्याची वेळ आली आहे अतिशय हलगर्जी पणा निकृष्ट नेवासा पोलीस स्टेशन कडून झाला आहे. या पोलीस स्टेशनचा मनमानी कारभार यापूर्वीही जनतेने अनुभवला आहे. ज्या पोलिसांनी आरोपीला पाठीशी घेतले त्या पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी देखील शिवाजी गांगुर्डे यांनी या वेळी केली तसेच नेवासा पोलिसांनी कर्तव्यात कसूर करून मुलीचा शोध घेण्यास खूप मोठा हलग र्जीपणा केला आहे. त्यामुळे मुलीच्या अपहरणांमध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि जोपर्यंत आदिवासी कुटुंबाला न्याय मिळत नाही आमची मुलगी आमच्या ताब्यात भेटत नाही तोपर्यंत आम्ही नेवासा पोलीस स्टेशन समोरून उठणार नाही व तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही शिवाजीराव गांगुर्डे यांनी यावेळी दिला. या वेळी आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य कैलासदादा माळी, राधाकृष्ण बर्डे, सुदाम मोरे ,संजय गांगुर्डे, अशोक पवार, चंद्रकांत बर्डे ,भगवान बर्डे ,रेणुका गायकवाड ,गणेश गायकवाड उपोषणास बसले आहेत.
0 Comments