महात्मा गांधी संकुलात आनंद बाजारातून व्यावहारिक धडे



लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलात महात्मा गांधी विद्यालय व कन्या विद्यालयाच्या वतीने नुकतेच आनंदबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदबाजाराचे उद्घाटन राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे व उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय ठाकरे, डॉ. शरद दुधाट, संजय डुबे, माधुरी वडघुले हे उपस्थित होते. यावेळी तालुका विज्ञान प्रदर्शनात सहभागाबद्दल पियुष भालेराव, साई शेलार, सिद्धी गोडसे, शाहिद इकरा तर अहिल्यानगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या विज्ञान स्पर्धा परीक्षेत सुजल दळे प्रथम, धनंजय भालेराव प्रथम तर कुमारी गोडसे हिचा चौथा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शुभांगी भरसाखळ यांचा इंग्लिश ओलंपियाड तर दिपाली आंबेकर यांची प्रवासवर्णनात विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राजेश पावशे यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी संकुलाच्या गुणवत्तेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमोद तोरणे यांनी स्पर्धा परीक्षेत प्राविण्य प्राप्त करण्याविषयी विद्यार्थ्यांना सूचना केल्या. या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांसह भाजीपाला विक्रीस ठेवला होता. विद्यार्थ्यांना यातून श्रमप्रतिष्ठा, व्यावहारिक ज्ञान व जबाबदारी याविषयी माहिती झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका वर्पे व संगीता उगले यांनी केले तर शेवटी शुभांगी भरसाकळ यांनी आभार मानले. आनंदबाजार यशस्वी होण्यासाठी बाबासाहेब अंत्रे, विलास गभाले, नरेंद्र ठाकरे, प्रफुल्ल नव्हाळे, अनिल गोलवड यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments