सातबाऱ्यावरिल लिस पेंडसी नोंद कमी करण्यासाठी वयोवृद्ध शेतकऱ्याच्या पंधरा महिन्यांपासून सोयगाव तहसील कार्यालयात खेट्या--




दिलीप शिंदे 
सोयगाव दि. २५ — सातबाऱ्यावरील लिस पेंडसी नोंद कमी करण्यासाठी वयोवृद्ध शेतकरी पंधरा महिन्यांपासून सोयगाव तहसील कार्यालयात खेट्या मारत असल्याचा धक्कादायक प्रकार दि.२४ बुधवारी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी उघडकीस आल्याने सोयगाव महसूल विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी संघर्ष आला आहे.जिल्हाधिकारी ही दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या कार्यशैलीवर जनतेकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
        याबाबत सविस्तर माहिती अशी, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध शेतकरी मदनलाल चंपालाल ललवाणी वय (६७) यांची हिंगणा ता. सोयगाव शिवारात गट क्रमांक ०२ मध्ये ललवाणींसह अन्य तिघे असे चौघांच्या नावावर असलेल्या ०८हेक्टर ०६ आर वर बेकायदेशीर लिस पेंडसी ची नोंद करण्यात आली आहे.ही नोंद सात बाऱ्यावरून कमी करण्यात यावी यासाठी वयोवृद्ध शेतकरी ललवाणी हे पंधरा महिन्यांपासून सोयगाव तहसील कार्यालयात खेट्या मारत आहे.अद्यापही त्यांचे काम प्रलंबित आहे. सातबाऱ्यावर लिस पेंडसी ची नोंद कशाच्या आधारे घेण्यात आली याची माहिती मिळावी यासंदर्भात माहिती अधिकारी कायद्याअंतर्गत माहिती मागून देखील माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे ललवाणी यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. तहसील कार्यालयाचा कारभार बघता जामनेर तहसील कार्यालयाचा कारभार शंभर टक्के चांगला असून सोयगाव तहसील कार्यालयाचा कारभार हा दिरंगाई, दुर्लक्ष व पारदर्शक नाही.तहसीलदार यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिलेला नाही.आदेश देऊनही कर्मचारी चालढकल करत आहेत.कर्मचाऱ्यांची तक्रार केली असता तहसीलदार कारवाई करीत नाही यामुळे तहसीलदार व कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप वयोवृद्ध शेतकऱ्याने केला आहे. सातबाऱ्यावर असलेली लिस पेंडसी ची नोंद तत्काळ कमी करून द्यावी अशी विनंती तहसीलदार यांना केली आहे. वयोवृद्ध शेतकऱ्यास केंव्हा न्याय मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments