सोयगावच्या तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांची पदोन्नती थांबवा,भाजपाचे माजी सरचिटणीस समाधान सूर्यवंशी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.२१-- सोयगावच्या तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्या कार्यपद्धतीमुळे भ्रष्टाचारात वाढ होऊन सरकारचे नाव सर्वसामान्य जनतेत बदनाम होत असून यामुळे भाजपची प्रतिमा ग्रामीण भागात मलिन होत असल्याने, चौकशी होईपर्यंत मनिषा मेने-जोगदंड यांची पदोन्नती थांबवा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते तथा सोयगाव भाजपाचे माजी सरचिटणीस समाधान सूर्यवंशी यांनी दि.१९ बुधवारी मंत्रालयात लेखी निवेदनाद्वारे केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी, तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांनी सोयगाव तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला तेंव्हा पासून मनमानी कारभार करीत असून या तहसील कार्यालयात नेहमीच दुपारी दोन अडीच नंतर येतात.केवळ आमदार ज्या वेळेस सोयगाव तालुका दौऱ्यावर असतात त्यावेळी मात्र वेळेचे बंधन पळतात. यांच्या कार्यकाळात तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक,शासकीय जागेतून गौण खनिज उत्खनन करण्याची परवानगी देणे, शेतकऱ्यांचे फेरफार,नावे दुरुस्त करणे,महसूल प्रशासनाशी निगडीत सामाजिक कार्यकर्ते,सर्वसामान्य नागरिक,शेतकरी यांनी केलेले उपोषण,आंदोलन दरम्यान देण्यात आलेल्या कारवाई करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे.

 तहसीलदार यांनी अद्यापही तालुक्यातील जनतेला न्याय दिलेला नाही. या प्रकरणासह गौण खनिज प्रकरणात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तलाठ्यांची मनमानी मुळे बाधित शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी तहसील कार्यालयात जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे तहसीलदार यांचे म्हणणे आहे.परंतु जनकल्याण कक्ष प्रमुख कोण, त्यांना संपर्क करण्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी कोणता हे मात्र सांगितले नाही.दैनिकांमध्ये तहसीलदार यांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती नुकसान विषयी विरोधाभास निर्माण करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या जात आहे.यामुळे शेतकरी चिंतेत झाला असून ग्रामीण भागातील शेतकऱ्याला तहसील कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे. तहसीलदार यांच्या या मनमानी कारभारामुळे तालुका त्रस्त झाला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात सरकार सह भाजप ची प्रतिमा मलिन होत आहे. तालुक्यातील महसूल शी निगडित सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई होत नाही तो पर्यंत तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना पदोन्नती देऊ नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते माजी तालुका सरचिटणीस समाधान सूर्यवंशी यांनी दिलेल्या  लेखी निवेदनात म्हटले आहे.यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री जमिनीवरील भाजपा कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments