सावळीविहीर खुर्द येथील अजिंक्यनगर परिसरात एका विहिरीत पडून चार वर्षीय चिमुकल्या मुलाचा मृत्यू!


सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
शिर्डी ( प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द परिसरातील 
अजिंक्य नगर भागात साडेचार वाजेच्या दरम्यान एका  पडक्या विहीरीत साडेचार वर्ष वयाचा चिमुकला पडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. अन्वय श्रीकांत वर्पे हा चिमुरडा विहीरीच्या कडेला खेळत असताना अचानक ऋषिकेश सुनील जमधडे यांच्या विहिरीत पडला. या विहिरीजवळ तो खेळत असल्याचे तसेच त्याच्या चपला विहिरीत दिसून आल्याने तो विहिरीतच पडला असल्याचा  दाट संशय होता.

 त्यामुळे येथे या चिमुकल्या चा शोध घेण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील तसेच गावातील ग्रामस्थ धावून आले. सरपंच पप्पू क्षीरसागर यांनी शिर्डी नगरपरिषदेचे अग्निशामक दल तसेच आणीबाणी पथक यांना कळवले तेही तात्काळ हजर झाले. साई संस्थांनची अग्निशामकही आली.हेड कॉन्स्टेबल वर्पे दादा व होमगार्ड सागर जाधव यांनी पोलीस स्टेशनला या संदर्भात खबर दिली त्यामुळे स्वतः पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे साहेब येथे तात्काळ आले . या विहिरीत या चिमुकल्या मुलाचा गाळ टाकून शोध घेतला जात होता. मात्र जास्त पाणी व गाळ असल्यामुळे तो मिळून येत नव्हता. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन मोटर पंप लावून या विहिरीतील पाणी उपसण्यात येत होते. तर दुसरीकडे गळ टाकून शोध चालू होता. शेवटी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान आणीबाणी बचाव पथकाच्या प्रयत्नाला यश आले व त्यांनी टाकलेल्या गळाला हा चिमुकला मुलगा लागला. त्यास मोठ्या शोकाकुल वातावरणात विहिरीतून वर  काढण्यात आले.  शिर्डी नगरपरिषद आणि राहाता अग्निशमन दलाचे जवान , साई संस्थांनच्या अग्निशामक दल , ग्रामस्थ यांनी त्यासाठी शर्तीची प्रयत्न केले.विहीरीत गाळ जास्त असल्यामुळे बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत  होता.  तीन ते चार तास मोठे रेस्क्यू ऑपरेशन करून या मयत चार वर्षाच्या चिमुकल्या बाळाला विहिरीतून वर काढण्यात आले. विहिरी जवळच त्यांचे घर असून मयत बाळाला पाहताच सर्वांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे सर्वत्र मोठे दुःख व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments